रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम बऱ्याच ठिकाणी अपूर्ण आहे. चिपळूण ते वाकेड या टप्प्यात जीवघेणा प्रवास सुरू आहे. हे काम आधी पूर्ण करावे आणि नंतर टोलचा निर्णय घ्यावा, असे खासदार विनायक राऊत यांनी येथे सांगितले.
रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या खासदार राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. टोल वसुलीसंदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून हालचाली सुरू आहेत. यावर ते म्हणाले, सिंधुदुर्गातील वाहनांना टोलमुक्ती मिळावी, अशी मागणी स्थानिक लोकांनी केली आहे. या बाबतचे निवेदन रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आले आहे. त्यावर अजून निर्णय झालेला नाही. त्याच पद्धतीने रत्नागिरीमधूनही मागणी करता येईल. परंतु मुंबई – गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे बऱ्याच टप्प्यातील काम अपूर्ण आहे. एनएचआयच्या नियमाप्रमाणे टोल वसुलीच्या निविदा काढल्या आहेत. तरीही टोल वसुली सुरू करण्यापूर्वी चिपळूण ते वाकेड या मार्गाचे चौपदरीकण पूर्ण करणे आवश्यक आहे. हा प्रवास वाहनांसाठी जीवघेणा ठरत आहे. चौपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर वाहने सुसाट चालवण्यास आरंभ झाला की, टोल वसुलीची कार्यवाही करावी. तोपर्यंत निर्णय घेऊ नये, असं विनायक राऊत म्हणाले आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 02/Dec/2022
