राज ठाकरेंचा आरोप बिनबुडाचा, 55 वर्षापासून पवारसाहेबांना महाराष्ट्र ओळखतोय : अजित पवार

0

मुंबई : राज ठाकरेंनी पवारसाहेबांवर केलेला आरोप धादांत खोटा आणि बिनबुडाचा असल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं.

पवारसाहेबांचं नाव घेतलं की बातमी होते, त्यामुळंचं अशा प्रकारचे वक्तव्य केलं जात असल्याचे पवार म्हणाले. अजित पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं.

राज ठाकरे ज्यावेळेस पवारसाहेबांची मुलाखत घेत होते, तेव्हा त्यांच्याबद्दल काय बोलत होते. म्हणजे इतकं दुटप्पी माणसाने वागू नये असे अजित पवार म्हणाले. पवारसाहेबांना 55 वर्षापासून उभा महाराष्ट्र ओळखत आहे. 55 वर्षात साहेबांनी नेहमी शाहू फुले आंबेडकरांचा विचार हाच डोळ्यासमोर ठेवला. तशाच पद्धतीने सर्व जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम केल्याचे अजित पवार म्हणाले. राज ठाकरेंचा आरोप हास्यास्पद असल्याचे अजित पवार म्हणाले.

नेमकं काय म्हणाले होते राज ठाकरे

जातीच्या राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या काही गोष्टी समोर आणल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे सुरू असल्याचा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात हे प्रकार सुरू झाले असल्याचे त्यांनी म्हटले होते. शरद पवार हे नेहमी शाहू फुले आंबेडकर हीच नावे घेतात. शिवाजी महाराजांचे यामध्ये नाव घेत नाहीत. इतर समाज आणि मराठा समाजात फूट पाडण्याचे काम सुरू असून 1999 पासून राज्यात विष कालवले जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. राज ठाकरे हे सध्या पक्षाच्या बैठकांच्या निमित्ताने कोकण दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

उदयनराजेंनी कुठे जावं हा त्यांचा सर्वस्वी अधिकार

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा सगळ्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. अशा प्रकारची वक्तव्य सातत्याने काहीजण करत आहेत, त्याबद्दल राज्यकर्ते लक्ष देताना दिसत नसल्याचे अजित पवार म्हणाले. राज्यकर्ते वेळ मारुन नेतात. या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेची भावना अतिशय तीव्र असल्याचे अजित पवार म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या जनतेचं दैवत आहे. त्यांच्याबद्दल असं कोणी उठसूट वक्तव्य करणं हे महाराष्ट्रातील जनता कदापी खपवून घेत घेणार नसल्याचे अजित पवार म्हणाले. उदयनराजेंनी कुठे जावं हा त्यांचा सर्वस्वी अधिकार असल्याचे अजित पवार म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 02/Dec/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here