मुंबई : महाराष्ट्रातील गोवर आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन 11 सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना होणार आहे.
ज्याप्रकारे कोरोना काळात टास्क फोर्सने वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर लक्ष दिलं होतं, मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या, त्याचप्रकारे गोवर साथीच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची 11 सदस्यीय टीम स्थापन होणार आहे.
डॉ. सुभाष साळुंखे टास्क फोर्सचे अध्यक्ष
राज्याच्या आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांना याबाबत निर्देश दिले आहेत. 11 सदस्यांची ही टास्क फोर्स असेल, ज्याची प्रक्रिया आता सुरु झाली आहे. यानुसार आरोग्य विभागाचे माजी महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष असतील. या टास्क फोर्सच्या टीममध्ये संसर्गजन्य रोग तज्ज्ञांचा समावेश असेल. टास्क फोर्सच्या स्थापनेनंतर वेळोवेळी बैठका होतील आणि वाढती रुग्णसंख्य नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.
गोवर साथीचा सर्वाधिक फैलाव मुंबईत झाला आहे. मुंबईत गोवर रुग्णांची संख्या 346 आहे. तर संशयित रुग्णांची संख्या 4355 वर पोहोचली आहे. यापैकी 117 बाळांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे, 16 बालकं ऑक्सिजन सपोर्ट असून 4 जण आयसीयूमध्ये आणि 3 बालकं व्हेंटिलेटरवर आहेत. आज 45 बाळांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
गोवर संसर्गाची लक्षणे कोणती?
गोवर आजारात सुरुवातीला तीव्र ताप येणे, खोकला, सर्दी अशी लक्षणे अशी लक्षणे आढळतात. तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी साधारण लालसर पुरळ अंगावर येते. काही मुलांना जुलाब, उलटीचा सुद्धा त्रास होतो. हा ताप साधारण पाच ते सात दिवस अंगावर राहतो. यामध्ये काही मुलांना तीव्र श्वसनदाह, न्यूमोनिया, मेंदूवर सूज, एन्केफेलायटीस, अंधत्व, अशा समस्या उद्भवू शकतात. तसेच, यामध्ये मुलं दगावण्याची सुद्धा भीती असते.
ग्रामीण भागातही सर्वेक्षण
मुंबईसह ठाणे, भिवंडी, नाशिक, मालेगावसह औरंगाबादमध्ये गोवरचे रुग्ण आढळले आहे. गोवर रुग्णांच्या संख्येने राज्यभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा देखील अलर्ट झाली आहे. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील लसीकरण न झालेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी आणि लसीकरण करण्यासाठी सर्वेक्षण मोहिम सुरु करण्यात आली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 02/Dec/2022
