सिंधुदुर्ग : जिल्ह्यात तिसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. आंबा वाहतुकीसाठी मुंबईसारख्या हॉटस्पॉट ठिकाणी गेलेल्या एका वाहन चालकाचा नमूना कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली असून वेंगुर्ले तालुक्यातील ही व्यक्ती आहे. यामुळे त्याचा गाव परिसर कन्टेंटमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. तसेच त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरु करण्यात आला आहे. याबाबतचा अहवाल मंगळवारी सायंकाळी उशिरा आला. ही व्यक्ती मुंबई येथे आंबा वाहतूक करून घेवून गेली होती. वाहन चालक असलेली ही व्यक्ती २७ एप्रिल रोजी जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर त्यांना यंत्रणेने संस्थात्मक क्वारंटाइन केले होते. २ मे रोजी त्यांचा स्राव घेवून मिरज येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. तो अहवाल मंगळवारी पॉझिटीव्ह प्राप्त झाला. जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण २६ मार्चला मिळाला होता. त्यानंतर त्याची दुसरी व तिसरी चाचणी निगेटिव्ह येत तो कोरोनामुक्त होऊन ९ एप्रिलला घरी गेला होता. त्यानंतर एकही रुग्ण न मिळाल्याने ग्रीन झोनमध्ये प्रवेश करण्यास जिल्ह्याला अवघे तीन दिवस शिल्लक असताना २९ एप्रिलला दुसरा कोरोनाबाधित रुग्ण मिळाला होता. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना अवघ्या सात दिवसांत तिसरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. त्यामुळे सध्या जिल्हा रुग्णालयात दोन व्यक्तींवर कोरोना उपचार सुरू आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
9:57 AM 06-May-20
