शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीच्या वेळापत्रकात तिसऱ्यांदा बदल

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीच्या वेळापत्रकात वारंवार बदल होतो. आता ग्रामविकास विभागाने तिसरे वेळापत्रक प्रसिद्ध केले असून 29 नोव्हेंबर ते 18 फेब्रुवारी या कालावधीत शिक्षक बदलीचे विविध टप्पे पूर्ण करण्यात येणार आहेत. जिल्हत एकूण 2620 शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत.

प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत ऑनलाईन बदल्यांचे वेळापत्रक राज्याच्या ग्रामविकास विभागामार्फत वारंवार बदलले जात असून सलग तिसर्‍यांदा वेळापत्रक बदलले आहे. त्यामुळे 18 फेब्रुवारी 2023 पर्यंत शिक्षक बदल्यांचा नवा कार्यक्रम जाहीर होणार आहे.

जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे करण्याचे येणार आहेत. त्यासाठी ग्रामविकास विभागाने 20 ऑक्टोबर रोजी शिक्षकांच्या बदल्यांचे वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र त्या वेळापत्रकानुसार ऐन दिवाळीत ही प्रक्रिया राबविली जाणार असल्याची टिका झाल्यावर एकाच दिवसात वेळापत्रक रद्द करून नवे वेळापत्रक तयार केले. त्यानुसार 31 ऑक्टोबर ते 5 जानेवारी या कालावधीत बदली प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत स्पष्ष्ट करण्यात आले होते. आता 29 नोव्हेंबर ते 18 फेब्रुवारी या कालावधीत विविध टप्पे पूर्ण करण्यात येणार आहेत.

नवीन वेळापत्रकानुसार दि. 29 नोव्हेंबर रोजी बदलीपात्र व बदली अधिकारप्राप्त याद्या तसेच विशेष सवंर्ग 1 व 2 यांच्या याद्या शिक्षणाधिकारी जाहीर करणार आहेत. दि.3 डिसेंबरपर्यंत शिक्षकांनी शिक्षणाधिकार्‍यांकडे अपील दाखल करणे, दि. 10 डिसेंबरपर्यंत अपील मंजूर करणे किंवा नाकारणे, दि. 19 डिसेंबरला पुन्हा याद्या जाहीर होणार असून दि. 20 ते 23 डिसेंबरदरम्यान भाग 1 साठी प्राधान्यक्रम भरता येणार आहे. दि. 29 रोजी रिक्त पदांची यादी प्रकाशित केली जाईल. दि. 30 डिसेंबर ते 4 जानेवारी 23 पर्यंत विशेष संवर्ग भाग 2 साठी प्राधान्यक्रम भरता येईल. दि. 8 जानेवारीपर्यंत बदल्या करून 9 रोजी रिक्त पदांची यादी प्रसिध्द होईल. बदली अधिकारप्राप्त शिक्षकांना 10 ते 14 जानेवारीपर्यंत प्राधान्यक्रम वभरावयाचा आहे. 16 ते 19 दरम्यान बदली प्रक्रिया होईल. दि. 20 रोजी रिक्त पदांची यादी जाहीर होईल. बदलीपात्र शिक्षकांना 21 ते 24 जानेवारी दरम्यान प्राधान्यक्रम भरता येईल. दि. 25 ते 29 दरम्यान बदली होईल. 30 जानेवारी रोजी रिक्त पदांची यादी जाहीर होईल.

विस्थापितांना 31 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत पर्याय भरता येईल. 4 ते 7 दरम्यान बदली होईल. तर दि. 8 रोजी रिक्त पदे जाहीर होतील. 10 वर्षे सुगम क्षेत्रात काम केलेल्यांची 9 फेब्रुवारीला यादी प्रसिध्द होईल. 10 ते 13 फेब्रुवारी दरम्यान अवघड क्षेत्रातील रिक्ता जागा भरण्याचा राऊंड व 14 ते 17 दरम्यान बदली प्रक्रिया होईल. 18 फेब्रुवारीला बदल्यांचे आदेश प्रकाशित होतील.

यामध्ये पावणेसहा हजार शिक्षकांपैकी 40 टक्के शिक्षक बदल्यासाठीच्या यादीत आले आहेत. सुरवातीला 1559 बदली पात्र आणि 1472 बदली अधिकार पात्र शिक्षकांची यादी 11 नोव्हेंबरला जाहीर करण्यात आली होती. त्यातील संवर्ग 1 म्हणजेच आजारी, परितक्त्या विधवा, माजी सैनिक आणि संवर्ग 2 म्हणजे पती-पत्नी एकत्रीकरण या अंतर्गत पात्र असलेल्या शिक्षकांकडून अर्ज मागविण्यात आले. संवर्ग 1 मध्ये 1227 तर संवर्ग 2 मध्ये 106 शिक्षकांनी अर्ज भरले. अर्ज पडताळणीत चौदा शिक्षकांनी संवर्ग 1 मध्ये चुकीची माहीती भरल्याचे उघड झाले. त्यांचे अर्ज बाद करण्यात आले. त्यामुळे 1213 अर्ज पात्र ठरले. ही प्रक्रिया झाल्यानंतर आजारी किंवा अन्य कारणांसाठी बदली नको अशा शिक्षकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या निकषाचा लाभ घेत 411 शिक्षकांनी बदलीसाठी नकार दिला आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम बदली पात्र 1148 शिक्षकांची तर बदली अधिकार पात्र 1472 ची यादी यादी 29) शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. या यादीवर आक्षेप असलेल्या शिक्षकांनी अर्ज देण्यासाठी 3 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. हे आक्षेप शिक्षणाधिकार्‍यांकडे नोंदवायचे आहेत. शिक्षकाकडून बदलीसाठी खोटी माहिती दिली, बदली पात्र यादीमध्ये नाव आले अशा प्रकारचे आक्षेप घेता येतात. एखादा शिक्षक दुसर्‍या शिक्षकाच्या माहितीवरही आक्षेप घेऊ शकतो.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:45 PM 02/Dec/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here