नाणीज येथे ट्रक-कारच्या धडकेत १ ठार, ५ जण जखमी

0

नाणीज : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर नाणीज येथील इरमलवाडी येथे आज दुपारी एक वाजता एका मालवाहू ट्रकवर समोरून येणारी कार आदळली.

या धडकेत ती कार रस्त्याच्या कडेला फेकली गेली. त्यातील एक जण ठार व पाच जण गंभीर जखमी झाले. सुवर्णा शिवराम नागवेकर (वय- ७०) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रक एमएच ०९ सीए ३१२४ जयगडहून सोलापूरला चालला होता. ट्रकचालक मंजुनाथ शिद्राय पाटील (वय – 38)रा. उंब्रज ता. इंडी, जि. विजापूर हा आहे. दरम्यान नाणीज येथील इरमलवाडी वाडी येथील वळणावर या समोरून येणाऱ्या कारने (एमएच ०१डीपी२६५८) ट्रकला जोरदार धडक दिली. त्यात ही कार रस्त्याच्या कडेला खाली फेकली गेली आहे. या कारमध्ये सहा जण प्रवास करत होते. सर्व जण साखरप्यावरून रत्नागिरीकडे लग्नासाठी चाललेले होते. यातील सुवर्णा शिवराम नागवेकर रा. वाडावेसवरांड, फनसवणे (भंडारवाडी) यांचा मृत्यू झाला आहे.

जखमी असे -१) हरिश्चंद्र वारंग, वय – ६५ २) हर्षदा हरिश्चंद्र वारंग वय – ६० ३) विक्रांत हरिश्चंद्र वारंग, वय -३० ४) सुनील पेडणेकर, वय- ५५. ५) सुषमा सुनील पेडणेकर,वय- ५० सर्व रा. खारघर, मुंबई.

या अपघाताची वार्ता नाणीज येथे समजताच येथील तरुण तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतकार्य सुरू केले. याच वेळी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची रुग्णवाहिका तातडीने अपघातस्थळी दाखल झाली. त्यातून मृत व जखमींना रत्नागिरी जिल्हा रुग्णालय दाखल केले. अधिक तपास पाली पोलीस ठाण्याचे हवालदार मोहन कांबळे आणि त्यांचे सहकारी करीत आहेत.

नाणीज येथील इरमलवाडी येथे नेहमी अपघात होत असतात. या अपघातामध्ये अनेक लोकांचे प्राण गेलेले आहेत. रत्नागिरी येथे चार नोव्हेंबर २०२२ ला जनता दरबार झाला. त्यामध्ये राजन बोडेकर यांनी संबंधित अपघातग्रस्त वाकण प्रशासनाच्या लक्षात आणून दिले होते. पालकमंत्री उदय सामंत यांनी महामार्गाच्या अधिकाऱ्यानी तातडीने तेथे उपाययोजना करायला सांगितल्या होत्या. मात्र पुढे त्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. वेळीच लक्ष दिले असते तर आजचा हा अपघात कदाचित टाळला असता, असे लोकांचे म्हणणे आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:41 PM 02/Dec/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here