रत्नागिरी : करोनाप्रतिबंधक संचारबंदी आणि जमावबंदी सुरू असली, तरी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना काही अटींवर त्यांच्या मासिक सभा घ्यायला परवानगी देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण यांनी स्पष्ट केले. ग्रामपंचायतींना नियमानुसार दरमहा सभा घेणे बंधनकारक आहे. त्या झाल्या नाहीत, तर शिक्षेची तरतूद आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १४४ कलम असल्याने पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या विनंतीनुसार ग्रामपंचायतींना मासिक सभा घेण्यास सशर्त मंजुरी दिली आहे. वैधानिक अनहर्ता टाळण्याच्या दृष्टीने फक्त सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांनाच बैठकीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. इतर कोणत्याही व्यक्तीला सभेस उपस्थित राहता येणार नाही. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याकरिता मासिक सभा शक्यतो मोकळ्या जागेत घेण्यात यावी. सॅनिटायझरचा वापर, तोंडाला मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे इत्यादींचे पालन करणे बंधनकारक राहील. तसेच इतर नियमही बंधनकारक राहणार आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:54 AM 06-May-20
