समाजाची उन्नती साधण्यासाठी ‘कुणबी जोडो अभियाना’त सहभागी व्हा; भूषण बरे यांचे आवाहन

0

रत्नागिरी : कुणबी समाजाचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न विधानसभेत पडून आहेत. आज कुणबी समाजाला कुणी वाली राहिलेला नाही. त्यामुळे या समाजाचे अस्तित्व लोप पावत चालल्याची गंभीर स्थिती उभी ठाकली आहे. यासाठी समाजाला एकत्र करून खितपत पडलेल्या प्रश्नांसाठी संघर्ष व लढा उभारावा लागणार आहे. भविष्यात समाजाची उन्नती साधण्यासाठी सर्व समाजबांधवांनी ‘कुणबी जोडो अभियाना’त सहभागी होण्याची साद कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईचे अध्यक्ष भूषण बरे यांनी यांनी दिली आहे.

कुणबी जोडो अभियानांतर्गंत रत्नागिरी तालुक्याचा मेळावा जे.के.फाईल्स जवळील कुणबी समाज भवन येथे अध्यक्ष भूषण बरे यांच्या अध्यक्षतेखाली शुकवारी दुपारी पार पडला. या मेळाव्याला राजकीय संघटन समितीचे अध्यक्ष अशोक वालम, नंदकुमार मोहिते, समाजन्नती संघाचे पदाधिकारी दौलतराव उर्फ भाई पोस्टुरे (मंडणगड), अरविंद डाफळे, रामभाऊ गराटे, संभाजी काजरेकर, बबन उंडरे, हरिश्चंद्र पाटील, पेजे न्यासाचे अध्यक्ष ॲड. सुजित झिमण, रत्नागिरी समाजोन्नती शाखा अध्यक्ष विलास सनगरे, गणेश जोशी, कुणबी युवाचे माधव कांबळे, तानाजी कुळये, शांताराम मालप, शांताराम खापरे, माजी पं.स.सदस्या सौ. स्नेहा चव्हाण अशा अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.

कुणबी समाजाला अजूनही न्याय मिळत नाही अशी स्थिती आहे. बेदखल कुळ पश्न, पिढ्यानपिढ्यांची घरे असलेल्या नावावर नसलेल्या जमिनी असे अनेक पश्न आहेत. हा समाजा खोतांचा बळी ठरत आहे. कुणबी समाजाची संख्या मोठी पण समस्याग्रस्त समाज आहे. आज स्वातंत्र्यांची अमृतमहोत्सवी 75 वर्षे झाली तरीही प्रश्न सुटताना दिसत नाही. राजकीय पक्षांनी वारेमाप वापर करून या समाजाची वाटणी केली आहे. त्यामुळे समाजाचे प्रश्न रखडलेले असल्याचे नंदकुमार माहिते यांनी पास्ताविकात राजकीय पक्षांवर तोफ डागली. त्यासाठी ‘कुणबी जोडो’चा नारा देण्यात आला आहे.

कुणबी समाज विविध राजकीय पक्षात लपला आहे. राजकीय पक्षांनी या समाजाला जास्तीत जास्त जि.प.पर्यंतच पाठवलाय. पण तेथे समाजाचे प्रश्न सुटू शकत नाही. आता हे सहन करण्यापलिकडे गेलेले आहे. हे थांबवायचे असेल तर तर राजकीय पक्षातील कुणबी समाजबांधवांनी विचार करावा. आपल्या गळ्यातील राजकीय पट्टे बाजूला सारून बाहेर पडावे. जोपर्यंत तुम्ही बाहेर येणार नाहीत, तोपर्यंत समाज या गर्तेतून बाहेर पडणार नसल्याचे अशोक वालम यांनी सांगितले आहे. उद्योजक बना, जि.प सदस्य नकोत, तर आता आमदार, खासदार बनायला हवे. त्यासाठी ‘कुणबी जोडो’च्या माध्यमातून पेरणी केली जात आहे, त्याला पाणी घालण्याचे काम समाजबांधवांनी करावे. त्यासाठी सर्वांनी साथ सहकार्य अपेक्षा वालम यांनी व्यक्त केली.

कुणबी युवाचे माधव कांबळे यांनीही समाजाच्या स्थितीवर परखड भाष्य करताना समाजाची आज गणती नाही. सरकारी योजनांची अंमलबजावणी होते, पण या समाजाची जास्त लोकसंख्येनुसार त्याचे लाभ मिळत नाही. शेतकऱयांची कामे होत नाहीत. लोकसंख्या जास्त असूनही आपण केवळ मतदार आहोत, पण राजे मात्र दुसरेच आहेत. कुणब्यांचे नेतृत्व दोन टक्केवाले करताहेत. कुळकायदा येउन गेला, उद्या तो बंदही होईल. त्यामुळे आता लोकशाही धोक्यात आली आहे. संविधानाची माहिती आपल्या समाजात पुरेपुर नसल्याने कुणबी समाजबांधवांचे मोठे नुकसान झाले असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

कुणबी समाज बांधवांना अजून कितीवेळा संघटीत व्हा म्हणून सांगणार असा प्रश्न ॲड. सुजित झिमण यांनी व्यक्त केला. 65 टक्के असलेल्या हा समाज जर एकवटला जाणे, संघटीत होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला जबाबदार आपणच असून आता तरी जागृत व्हा असे झिमण यांनी सांगितले. कुणबी जोडो अभियानाच्या या चळवळीला सातत्य असायला पाहिजे. त्या माध्यमातून जिल्ह्यात कुणबी समाजाचे नेतृत्व करण्याची ताकद तयार करूया असे दौलतराव पोस्टुरे यांनी समाजबांधवांना आवाहन यावेळी केले. या कार्यकमाचे सूत्रसंचालन संजय माचिवले यांनी केले. तर आभारपदर्शन विलास सनगरे यांनी केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:56 PM 03/Dec/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here