पुणे : कोरोनाच्या साथीमुळं निर्माण झालेल्या आरोग्य आणीबाणीतून मार्ग काढण्यासाठी खासगी संस्था, संघटना मोठ्या प्रमाणावर हातभार लावत आहेत. देशातील आघाडीची आयटी कंपनी असलेल्या ‘विप्रो’नं पुण्यातील हिंजवडी कॅम्पसमधील ४० हजार चौरस फुटांची जागा कोरोनाग्रस्तांसाठी उपलब्ध करून दिली आहे. या जागेवर ४५० खाटांचं तात्पुरतं रुग्णालय उभारण्यात येणार आहे. ‘विप्रो’चे अध्यक्ष रिषाद प्रेमजी यांनी ही माहिती दिली. याशिवाय कंपनीनं याबाबत एक सविस्तर पत्रकही प्रसिद्ध केलं आहे. त्यानुसार येत्या ३० मे पर्यंत कंपनीची जागा सरकारला सुपूर्द करण्यात येणार आहे. वर्षभरानंतर पुन्हा एकदा ती कंपनीच्या ताब्यात घेतली जाणार आहे.
