लॉकडाऊन स्थितीमुळे राज्यातील दहावी, बारावीच्या परीक्षांचा निकाल उशिरा लागणार असं दिसत आहे. उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात लॉकडाऊनमुळे अडसर आला आहे. त्यामुळे बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासणी कामातील शिक्षकांना तसेच अन्य अधिकाऱ्यांना प्रवासास परवानगी द्यावी, अशी विनंती शालेय शिक्षण विभागाने केली आहे. दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका केवळ शिक्षकांनी तपासल्या म्हणजे प्रक्रिया पूर्ण होत नसते, त्या मॉडरेटरकडे पाठवाल्या लागतात, त्या निकाल तयार करण्यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे जमा कराव्या लागतात. या संपूर्ण प्रक्रियेसाठी काही शिक्षक किंवा शाळेच्या शिपायांना या उत्तरपत्रिका शाळेतून परीक्षकांकडे पोहोचवाव्या लागणार आहेत. तत्पूर्वी त्या शाळेकडे जमा करण्यासाठी शिक्षकांनाही प्रवास करावा लागणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी संबंधित शिक्षक, कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडे केली होती. त्या अनुषंगाने शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी राज्यातील सर्व महापालिका आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून या शिक्षकांना प्रवासाची परवानगी देण्याची विनंती केली आहे.
