विश्वात भारताकडून अपेक्षा वाढल्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी

0

नवी दिल्ली : आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे.

अधिवेशनापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी देशासह तरुण खासदारांना आवाहन केलंय.

जी-20 च्या माध्यमातून भारताला जगाला सामर्थ्य दाखवण्याची संधी – पंतप्रधान मोदी

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले, जी-20 चं अध्यक्षपद भारताला मिळणं ही मोठी संधी आहे. यामुळे भारताला आपलं सामर्थ्य दाखवण्याची संधी मिळाली आहे, विश्वात भारताकडून अपेक्षा वाढल्या आहेत. भारताला आपली ताकद दाखवण्याची संधी मिळत आहे. दरम्यान देशाचे आणि जी-20 संबंधित महत्वाचे निर्णय अधिवेशनात होतील. असं ते म्हणाले. G20 शिखर परिषद ही भारताची क्षमता जगासमोर मांडण्याची संधी आहे. एवढा मोठा देश, लोकशाही, इतकी विविधता, एवढी क्षमता, हे सर्व जगाला कळायला हवे. भारताला आपली क्षमता संपूर्ण जगाला दाखवण्याची संधी आहे. यापूर्वी सर्व पक्षांच्या अध्यक्षांशी चर्चा झाली आहे. त्याचे प्रतिबिंब सभागृहातही दिसणार आहे.

”नवीन खासदारांना जास्तीत जास्त संधी द्या” – पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताला जगात पुढे नेण्याची संधी लक्षात घेऊन नवे तसेच ऐतिहासिक निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी खात्री आहे की, सर्व राजकीय पक्ष चर्चा करून देशाचे मूल्य वाढवतील. ते म्हणाले, संसदेच्या या अधिवेशनाला वेळ शिल्लक असताना, मी सर्वपक्षीय नेत्यांना आग्रह करू इच्छितो. जे पहिल्यांदाच सभागृहात आले आहेत. नवीन खासदारांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी आणि लोकशाहीच्या भावी पिढीला तयार करण्यासाठी जास्तीत जास्त संधी द्या. त्यांचा चर्चेतील सहभाग वाढला पाहिजे. यापूर्वी मी सर्व पक्षांच्या खासदारांसोबत अनौपचारिक बैठका घेतल्या आहेत. यात एक गोष्ट नक्की सांगितली जाते की, सभागृहात गदारोळ होतो आणि कामकाज तहकूब झाल्याने या नव्या खासदारांचे खूप नुकसान होते. आम्हाला जे सांगायचे आहे ते राहून जाते.

सर्व पक्षांना आणि खासदारांना पंतप्रधानांकडून विनंती
मोदी पुढे म्हणाले, विरोधी पक्षाचे खासदारही तेच सांगतात. वादात बोलण्याची संधी मिळत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. मला वाटते सर्व पक्षाच्या नेत्यांना या खासदारांच्या वेदना समजतील. त्यांच्या क्षमतेत भर घालण्यासाठी, त्यांच्या विकासासाठी. त्यांच्या उत्साहाचा देशाला लाभ होवो. लोकशाहीसाठी हे अत्यंत आवश्यक आहे. मी सर्व पक्षांना आणि सर्व खासदारांना विनंती करतो की, त्यांनी हे अधिवेशन अधिक फलदायी करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत. या अधिवेशनात आणखी एक भाग्याची गोष्ट आहे की, एका शेतकऱ्याचा मुलगा आज देशाच्या राज्यसभेचा अध्यक्ष झाल्याने देशाची शान वाढणार आहे.

आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार असून ते 29 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात सरकार कडून अनेक विधेयके मंजूर करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, जुनी पेन्शन योजना, आसाम-मेघालय सीमा वाद आदी मुद्द्यांवर सरकारला घेराव घालण्यात येणार आहे. संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र कर्नाटक वादाचे पडसाद उमटणार असून शिवसेना ठाकरे गट या प्रश्नावर सभागृहात आवाज उठवणार आहे. तर दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्याच्या तयारीत आहे.

अधिवेशनात ‘ही’ विधेयके सादर केली जाणार
या हिवाळी अधिवेशनात 16 विधेयके सादर केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामध्ये डेंटल कमिशन विधेयक, राष्ट्रीय नर्सिंग आणि मिडवायफरी कमिशन विधेयक, मल्टिस्टेट सहकारी संस्था सुधारणा विधेयक, जुने अनुदान लिनियमन विधेयक, वन संरक्षण संशोधन विधेयक याचा समावेश आहे. संसदेच्या गेल्या अधिवेशनामध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हिवाळी अधिवेशन नव्या इमारतीमध्ये होईल, असा दावा केला होता. मात्र, नव्या इमारतीचे बांधकाम पूर्ण न झाल्याने हे हिवाळी अधिवेशन जुन्याच इमारतीमध्ये होणार आहे.

कॉंग्रेसकडून ‘या’ मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्याची मागणी
आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात विरोधक अनेक मुद्दे उपस्थित करू शकतात. काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेसने आर्थिक आधारावर आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा मुद्दा उपस्थित करत या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्याची मागणी केली. याशिवाय निवडणूक आयोगाचा कारभार, महागाई, बेरोजगारी यावर चर्चा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 07/Dec/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here