सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे राज्यस्तरीय खेळाडू महेश उर्फ डुबा गिरकर (46) रा. मालवण बाजारपेठ यांचे बुधवारी आकस्मिक निधन झाले. पित्ताशयाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना दोन दिवसांपूर्वी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. सामाजिक कार्यातही पुढाकार असलेल्या महेश यांच्या मृत्यूनंतर मालवणात हळहळ व्यक्त होत आहे. सन 2003 मध्ये राज्यस्तरीय कबड्डी पुरुष गटात सिंधुदुर्ग महाराष्ट्र राज्यात तृतीय क्रमांकाचे स्थान प्राप्त करून देण्यात महेश यांचे फार मोठे योगदान होते. मालवणमध्ये कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात त्यांचा पुढाकार असायचा. अनेक नामवंत खेळाडू त्यांनी घडविले. महेश हे राज्यस्तरीय पंच होते. त्यांच्या निधनाने मालवणच्या क्रिडा क्षेत्राला फार मोठा धक्का बसला असून जिल्ह्याच्या कबड्डीचे फार मोठे नुकसान झाले आहे. दुपारी मालवण बाजारपेठ स्मशानभूमीत त्यांच्या वर अंत्यसंस्कार करण्यात आले.
