नवी दिल्ली : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी करोना आणि लॉकडाउनसंदर्भात पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारला निशाण्यावर धरले आहे. १७ मेनंतर काय होणार?… लॉकडाउन कधीपर्यंत सुरू राहणार?… लॉकडाउनबाबत मोदी सरकारकडे पुढील रणनीती काय? असे एक ना अनेक प्रश्न सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला विचारले आहेत. सोनिया गांधी यांनी आज काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित केली. या बैठकीत यांनी सरकारवर निशाणा साधला. या बैठकीला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माजी अध्यक्ष राहुल गांधींसह इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते. कोरोनामुळे राज्यांसमोरील आर्थिक संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. तसेच या परिस्थितीतीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडूनही कुठल्याही प्रकारची मदत उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. या बैठकीला उपस्थित असलेल्या राजस्थान, पंजाब, छत्तीसगड आणि पुदुचेरीच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारने राज्यांना मदत पॅकेज देण्याची मागणी केली.
