ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे 20 लाख पक्ष सदस्यांचे अर्ज

0

नवी दिल्ली : शिवसेनेत फूट पडल्यानंतर खरी शिवसेना कोणाची हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पोहचला आहे.

निवडणूक आयोगाने पक्षावरील आपल्या दाव्याच्या समर्थनासाठी कागदपत्रांची मागणी दोन्ही गटांकडे केली होती. पक्षावरील आपला दावा सिद्ध करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने 20 लाख प्राथमिक सदस्यांचे अर्ज निवडणूक आयोगासमोर सादर केले आहेत. आज, गुरुवारी अर्ज जमा करण्याचे शेवटचा दिवस होता. तर, शिंदें गटानेदेखील तेवढेच प्राथमिक सदस्यांचे अर्ज दाखल करणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगासमोरील लढाई अधिक तीव्र होणार असल्याचे चित्र आहे.

शिवसेना ठाकरे गटाने आपल्या गटात असलेल्या सदस्यांचे 20 लाखांहून अधिक अर्ज-प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे जमा केले असल्याचे वृत्त आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाने एका विहीत नमुन्यात अर्ज आणि प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, आम्ही 20 लाख प्राथमिक सदस्यांचे अर्ज दाखल केले आहेत. त्याशिवाय, आम्ही तीन लाख पदाधिकाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहेत. यामध्ये जिल्हा प्रमुखांपासून ते गटप्रमुखांचा समावेश आहे. त्याशिवाय इतरही काही कागदपत्रे सादर केली असल्याचे देसाई यांनी सांगितले.

ऑक्टोबर महिन्यात शिवसेना ठाकरे गटाने जवळपास 8.5 लाख प्राथमिक सदस्यांचे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगात दाखल केले होते. हे प्रतिज्ञापत्र दोन ट्रक भरून आणले गेले होते.

शिंदे गटाचे किती प्रतिज्ञापत्र?

शिंदे गटानेदेखील शिवसेनेवर दावा सांगण्यासाठी कंबर कसली आहे. पक्षाचे 40 आमदार आणि 13 खासदार सोबत घेतल्यानंतर शिंदे गटाने आपलाच गट खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. शिंदे गटातील एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाने आतापर्यंत 10 लाख 30 हजारांच्या घरात सदस्यत्व अर्ज आणि प्रतिज्ञापत्र दाखल केले आहेत. त्याशिवाय 1.8 लाख पदाधिकाऱ्यांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. शिंदे गटाकडून आणखी 10 लाख अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती या शिंदे गटाच्या नेत्यांनी दिली.

देसाईंचा आरोप

निवडणूक आयोगाने सुरुवातीला दोन्ही गटांसाठी कागदपत्रे, प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी 23 नोव्हेंबर ही अंतिम मुदत ठेवली होती. परंतु नंतर ती 2 ऑक्टोबर आणि शेवटी 9 डिसेंबरपर्यंत वाढवली होती.

अनिल देसाई यांनी सांगितले की, 2 डिसेंबर रोजी निवडणूक आयोगाने पत्र जारी करत कागदपत्रे दुसऱ्या स्वरुपात सादर करण्याची सूचना केली होती. विरोधी गटाला पुरेशी सदस्यत्व संख्या मिळू देण्यासाठी हा प्रयत्न केला असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोगाला पत्र लिहून आतापर्यंत सादर केलेली अर्ज आणि प्रतिज्ञापत्रातील स्वरूप बदलायचे असेल किंवा पत्ता बदलायचा असेल, इतर तपशील हवा असल्यास त्याला वेळ लागणार असल्याचे सांगणार आहोत, अशी माहिती देसाई यांनी दिली. आम्ही मूळ शिवसेना असल्याने कमी वेळेत 20 लाख अर्ज दाखल केले असल्याचेही त्यांनी म्हटले.

जुलैमध्ये एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांना 50 लाख सदस्यांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे लक्ष्य दिले होते. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने प्रतिज्ञापत्रासाठीची मोहीम सुरू केली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:20 08-12-2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here