मुंबई : लॉकडाऊनमुळे शहरात स्थलांतरित मजूर, कामगारांना स्वगृही परतण्यासाठी केंद्र सरकारनं रेल्वेमार्फत विशेष श्रमिक ट्रेन सुरु केल्या. परंतु लॉकडाऊनमुळे आधीच हातच काम जाऊन आर्थिक संकटात सापडलेल्या मजुराकडून प्रवास खर्च आकारण्यावरून केंद्रावर जोरदार टीका झाली. अशात रेल्वे मंत्रालयानं स्थलांतरित कामगार व मजुरांच्या परतीच्या प्रवास खर्चावर रेल्वे खातं ८५ टक्के सूट असल्याचे स्पष्ट केलं. मजुरांना प्रवास खर्चावर रेल्वे खातं ८५ टक्के सूट असल्याचं वृत्त राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेटाळून लावलं आहे. आजपर्यंत रेल्वे खात्यानं तसा कोणताही आदेश काढलेला नाही, असं देशमुख यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातून आपापल्या गावाकडे निघालेल्या गरीब कामगार व मजुरांना आजही तिकीट काढावं लागत आहे’, असा दावा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. ‘सध्याच्या परिस्थितीत रेल्वे प्रशासनानं गरीब कामगारांकडून प्रवास खर्च घेऊ नये,’ अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.
