गयाना: भारत आणि वेस्ट इंडिज विरुद्ध गयाना येथे गुरुवारी होणारा पहिला वन डे सामना पावसामुळे अखेर रद्द करण्यात आला. त्यामुळे तीन सामनाच्या मालिकेतील पहिला सामना रद्द झाल्याने दुसरा वन डे सामना 11 ऑगस्टला पोर्ट ऑफ स्पेन येथे रंगणार आहे. सामना सुरु होण्याच्या आधीपासूनच पाऊस सुरु होता. या कारणाने टॅास देखील उशीरा झाला. त्यानंतर भारताने टॅास जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच सामना सुरु होण्यास पावसामुळे विलंब झाल्याने 43 षटकांचा करण्यात आला. परंतू त्यानंतर देखील तीनवेळा पावसाने खो घातल्याने शेवटी 13 षटकानंतरच पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. यावेळी वेस्ट इंडिजने 54 धावा करत 1 विकेट्स गमावली होती. तसेच भारताचे गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांनी सुरुवातीपासूनच टिच्चून मारा केल्याने स्फोटक फलंदाज ख्रिस गेल 31 चेंडूत 4 धावाच करू शकला. त्यानंतर 11व्या षटकात कुलदिप यादवने गेलला स्वस्तात बाद करत पहिली विकेट्स घेतली. तसेच लुईसनं 36 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 40 धावा केल्या.
