परजिल्ह्यातून आलेल्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये नेत असताना एसटी चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

खेड : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर महामार्गावरील कशेडी येथे सुरु करण्यात आलेल्या तपासणी नाक्यावर कार्यरत असलेल्या एका एसटी कर्मचाऱ्याचे कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. नितीन नलावडे (३२) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. बाहेर गावाहून कोकणात येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यासाठी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी येथे तपासणी नाका सुरु करण्यात आला आहे. या ठिकाणी कर्तव्यावर असलेले महसूल, पोलीस, व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्याकडून बाहेरून येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जाते. त्यानंतर त्यांना चेकनाक्यावर तैनात ठेवलेल्या एसटी बसने क्वारंटाईन सेंटरवर नेऊन 14 दिवसांसाठी क्वारंटाईन केले जाते. नितीन नलावडे हे एसटी चालक हेच कर्तव्य बजावण्यासाठी मंगळवारी रात्री कशेडी येथे कर्तव्यावर होते. बुधवारी सकाळी 6.10 च्या सुमारास ते नागरिकांना घेऊन लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहातील क्वारंटाईन सेंटरकडे निघाले होते. ते एसटी सुरू करणार इतक्यात अचानक त्याच्या छातीत दुखू लागले. वेदना असह्य झाल्याने ते एस्. टी. तून खाली उतरले. मात्र, त्यांना उभे राहणे शक्य न झाल्याने रस्त्यातच आडवे झाले. चेक नाक्यावर हजर असलेल्या अन्य सहकाऱ्यांनी त्यांना तात्काळ कळंबणी येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारांसाठी आणले. मात्र त्यांच्यावर उपचार सुरु होण्यापूर्वीच निधन झाले. खेड पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here