विशाखापट्टणममध्ये वायू गळती; ५ मृत्युमुखी, शेकडो अत्यवस्थ

विशाखापट्टणम : पॉलिमर कंपनीत झालेल्या विषारी गॅस गळतीमुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. शेकडो अत्यवस्थ असून एकूण १७० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या विषारी वायूमुळे तीन किमीच्या परिसरावर प्रभाव पडला असून आतापर्यंत एकूण ५ गावांमधील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ही घटना आज सकाळी घडली. आर. आर. वेंकटपुरम येथे असलेल्या विशाखा एल. जी. पॉलिमर कंपनीत विषारी वायूची गळती झाली आहे. या विषारी वायूमुळे शेकडो लोकांना डोकेदुखी, उलटी आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर असणाऱ्यांत बहुतेक जेष्ठ नागरिक आहेत. ही वायू गळती नेमकी कशामुळे झाली याबाबत कळू शकलेले नाही. वायूगळतीची माहिती मिळताच विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी विनय चंद घटनास्थळी दाखल झाले आहेत. दोन तासांमध्ये परिस्थितीवर नियंत्रण मिळवले गेले असे चंद यांनी सांगितले. वायू गळतीच्या परिसरात लोकांना न जाण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here