नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुद्ध पोर्णिमेच्या निमित्ताने देशवासियांना संबोधित केलं. भगवान बुद्ध यांचं प्रत्येक वचन भारताला मजबूत करणारं आहे. बुद्धाच्या विचारांचं पालन करुनच देश संकटातून बाहेर येऊ शकतो, असं ते म्हणाले. आपल्यासाठी संकटाची ही वेळ एकमेकांची मदत करण्यासाठीची वेळ आहे. त्यामुळे भारत संपूर्ण जगासोबत कोणताही स्वार्थ न ठेवता उभा आहे तसंच कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहणं हीच बुद्धांची शिकवण असल्याचं मोदी म्हणाले. बुद्ध हे केवळ नाव नसून मानवतेचा विचार आहे. बुद्धाची दया, करुण, समभाव आणि स्वीकार ही बुद्धांची चार सत्य देशाची प्रेरणास्थान आहेत. आज संपूर्ण जग संकटातून जात आहे. भारत या वेळी विश्वहितासाठी काम करत आहे आणि नेहमीच करत राहील, अशी ग्वाही देत अशा कठीण काळात तुम्ही तुमच्या कुटुंबाची आणि आरोग्याची काळजी घ्या, आपले संरक्षण करा, तसेच दुसऱ्यांची मदत करा, असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं.
