मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईतील कोरोना रूग्ण दाखल असलेल्या सेंट जॉर्ज, जीटी आणि नायर रुग्णालयांना भेटी देऊन डॉक्टर्स, पारिचारिका, तैनात पोलिस कर्मचारी यांची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या खंबीर लढ्याचा गौरव केला आणि त्यांचे आभार मानले. रुग्णालयांना भेट देऊन फडणवीस यांनी तेथील डॉक्टरांकडून करोनाची सद्यस्थिती, उपचार, डॉक्टर्स, पारिचारिका यांच्या सुविधांची माहिती घेतली. संपूर्ण देशात डॉक्टर्स, पारिचारिका आणि सारेच आरोग्य कर्मचारी जोखीम पत्करून अतिशय चांगले काम करत आहेत. समाजाची ही फार मोठी सेवा आहे. त्यांचे हे काम संपूर्ण देश कायम स्मरणात ठेवेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. रुग्णालयाची सुरक्षा आणि होणाऱ्या गर्दीचे नियंत्रण यात समतोल साधत पोलिस करत असलेल्या कामगिरीसाठी त्यांनी पोलिसांना धन्यवाद दिले.
