‘..अन्यथा राष्ट्रवादी स्वबळावर लढेल’, चिपळुणातील मेळाव्यात पदाधिकाऱ्यांचा निर्धार

0

चिपळूण : ज्या पक्षाचा आमदार असेल तेथे नगरपालिका निवडणुकीत झुकते माप देण्याची भूमिका महाविकास आघाडीने यापूर्वीच घेतली आहे. आमदार शेखर निकम या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

त्यामुळे आगामी नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळाले पाहिजे. नगराध्यपद राष्ट्रवादीला असेल तरच आघाडी होईल; अन्यथा राष्ट्रवादी स्वबळावर लढेल, अशी भूमिका चिपळुणातील शहर मेळाव्यात घेण्यात आली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चिपळूण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रविवारी शहरातील बांदल हायस्कूल येथील सभागृहात कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्याला महिलांसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित हाेते.

यावेळी आमदार शेखर निकम म्हणाले की, माजी आमदार रमेश कदम यांनी शहर व तालुक्यात मोठा संघर्ष करून राष्ट्रवादी रुजविली. तळागाळापर्यंत संपर्क ठेऊन संघटन वाढविले. आमदारकीच्या काळात असंख्य विकासकामे केली. त्यामुळे मी नशीबवान आहे, मला अधिक संघर्ष करावा लागला नाही, असे ते म्हणाले.

पक्ष निरीक्षक बबन कनावजे म्हणाले की, सध्याच्या सरकारमध्ये कोणत्याही निवडणुका घेण्याची हिंमत नाही, म्हणूनच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुका पुढे ढकलल्या जात असल्याचे सांगितले. येत्या काही महिन्यांत पक्षांतर्गत निवडणुका लागतील. त्यामुळे सदस्य नोंदणीकडे लक्ष द्या, असे त्यांनी सांगितले.

यावेळी विद्यार्थी संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले, तसेच विधानसभा निवडणुकीत आमदार शेखर निकम यांना सर्वात जास्त मतदान करणाऱ्या मुरादपूर विभाग, तसेच पेठमाप-गोवळकोट प्रभागातील मतदान केंद्र परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर माजी नगरसेवक व काँग्रेसचे पदाधिकारी रतन पवार यांनी पुन्हा राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला.

या मेळाव्याला एम. बदुकवाले, सूचय रेडीज, मिलिंद कापडी, दादा साळवी, शिरीष काटकर, जयंद्रथ खताते, चित्रा चव्हाण, दीपिका कोतवडेकर, पूजा निकम, रिहाना बिलजे, राधिका तटकरे, राजू कदम, रमेश खळे, सीमा चाळके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

रमेश कदमांकडे नेतृत्व

संघटना वाढली तरच आपली ताकद वाढेल. नगरपालिकेतील अनुभव पाहता आगामी नगर परिषद निवडणूक ही रमेश कदम यांच्या नेतृत्वाखालीच पार पडेल, असे आमदार शेखर निकम यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नगर परिषद निवडणुकीचे नेतृत्व रमेश कदमांकडे जाणार हे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:40 12-12-2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here