राज ठाकरेंच्या ओरिजनल स्टाईलचा फॅन, तीच कायम ठेवावी : रोहित पवार

0

मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमाप्रश्न पेटला आहे. त्यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या वक्तवांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे.

बेळगावमध्ये येणाऱ्या महाराष्ट्राच्या नेत्यांना बोम्मई यांनी इशारा दिला होता. दरम्यान, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली धमकी धुडकावून लावत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे बेळगावमध्ये दाखल झाले. बेळगावमध्ये दाखल झाल्यानंतर रोहित पवार यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यातच रोहित पवार यांनी राज ठाकरे यांच्या शैलीबाबत विधान केले आहे.

महापुरुषांचा वारंवार अवमान होत असेल, तर महाराष्ट्रातील जनता का गप्प बसेल? पुण्यातील बंदला छोटे दुकानदार, व्यापारी यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे. अस्मिता टिकवण्यासाठीच लोक एकत्र आले आहेत. राज्यपाल पत्राच्या माध्यमातून व्यक्त झाले. मात्र, माफी मागितली नाही. अमित शाहांऐवजी राष्ट्रपतींना पत्र लिहायला हवे होते. संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीला लोक माफ करणार नाहीत. अशी किती पत्र लिहिली, तरी लोक माफ करणार नाहीत, अशी रोखठोक भूमिका रोहित पवार यांनी मांडली.

राज ठाकरेंच्या ओरिजनल स्टाईलचा फॅन, तीच कायम ठेवावी

राज ठाकरेंबाबत विचारले असता, मी राज ठाकरेंच्या ओरिजनल स्टाईलचा फॅन असल्याचे रोहित पवार म्हणाले. आता ते कुठेतरी भाजपचा विचार घेऊन पुढे जात असल्याचे दिसून येत आहे. राज ठाकरे यांनी आता स्वतःची ओरिजनल स्टाईल कायम ठेवावी. भाजप आपली राजकीय पोळी भाजून घेत असेल, तर त्याला आपण पाठिंबा का द्यायचा? राजकारण हे तात्पुरते असते, विचार हे दीर्घकालीन असतात, असे रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. धमकी देणाऱ्याचा शोध लागला असून, तो बाहेरील राज्यातील असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. यावर बोलताना, शरद हे देशाचे मोठे नेते आहेत. असे अनेक फोन, धमक्या याआधी सुद्धा आल्या आहेत. मात्र, सामान्यांना केंद्रबिंदू ठेवून ते काम करत आहेत. महाराष्ट्रात खालच्या पातळीचे राजकारण सुरू आहे, अशा येणाऱ्या धमक्यांबाबत काळजी घेतली पाहिजे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:58 13-12-2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here