धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे प्रेझेंटेशन : मिऱ्या ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

0

रत्नागिरी : मिऱ्या बंधाऱ्याचे काम एकाचवेळी तीन ते चार ठिकाणी सुरू करा, जादा मशिन लावा, हे वाटते तेवढे सोपे काम नाही. खोदून ठेवले आणि बंधारा झाला नाही तर गाव वाहून जाईल. त्यात पत्तन विभागामार्फत ग्रामपंचायतीला पत्र देऊन दोन गावांमध्ये भांडणं लावण्याचे काम करत आहेत; पण आम्ही जागृत आहोत. आता एकमेकांची डोकी फोडण्यापूर्वी अगोदर अधिकाऱ्यांची डोकी फोडू, असा इशारा देत मूळ आराखड्याप्रमाणे मिऱ्या बंधाऱ्याचे काम झाले पाहिजे. आराखड्यात काही बदल हवे आहेत यासाठी मोनार्ज कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घालून द्या. केवळ खडकवासच्या (पुणे) येथील एसी कार्यालयात बसून आराखडे करू नका.  प्रत्यक्ष जागेवर येऊन आराखडा करावा, असे परखड मत मिऱ्या ग्रामस्थांनी मांडले.

स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीवरून आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेवरून आज मिऱ्या श्री दत्तमंदिरात पत्तन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना १६० कोटींच्या मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे प्रेझेंटेशन दाखवले. या वेळी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. सुरवातीला आम्हाला नरिमन पॉइंटच्या धर्तीवर बंधारा  होणार असल्याचे सांगण्यात आले होते; मात्र प्रत्यक्ष आराखडा वेगळा करण्यात आला आहे. बंधाऱ्याची उंची कमी असून ती वाढवणे आवश्यक आहे. केवळ पावसाळ्यातील भरतीचा अभ्यास न करता वादळातील लाटांची उंची लक्षात घेऊन बंधाऱ्याचा आराखडा होणे आवश्यक आहे, असे मत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांसमोर मांडले. सादरीकरण देताना अधिकाऱ्यांनी बंधाऱ्याचा मूळ उद्देश समजावून सांगितला. बंधाऱ्याचा मूळ उद्देश किनाऱ्यावरील जमिनीची धूप रोखणे, किनाऱ्याची निर्मिती करणे, पर्यटनाला चालना देणे, किनाऱ्यावरील घरांची पडझड रोखणे हा आहे. त्यामध्ये धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या काटकोनामध्ये आवश्यक त्या लांबीचे सात ग्रोएन्स बांधणे, वेगवेगळ्या आकारांच्या दगडांची रचना, उतारावर टेट्रापॉड बसवून नंतर बांधकाम करण्यात येणार आहे. सुमारे ३.४०० कि. मी. लांबीचा हा बंधारा आहे. त्यावर पायवाट असणार आहे. बंधाऱ्यावर कोणतेही वाहन जाणार नाही याची खबरदारी घेण्यात येणार आहे.

अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर ग्रामस्थांनी बंधाऱ्याच्या उंचीला आक्षेप घेतला. आम्ही स्थानिक ग्रामस्थ गेली पिढ्यानपिढ्या येथे राहत आहोत. लाटा केव्हा किती उंचीच्या उसळतात याची जास्त माहिती आम्हाला आहे. आराखडा तयार करताना किनाऱ्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून मोनार्ज कंपनीने घेणे महत्वाचे होते; मात्र तसे झाले नाही तर दुसरीकडे  प्रत्यक्ष आराखडा व होणारे काम यामध्ये तफावत आहे.

बंधाऱ्याचे काम सुरू करण्यापूर्वी तज्ञ अधिकाऱ्यांशी चर्चा करून आमच्या शंकाचे निरसन करणे आवश्यक होते. त्यानंतरच बंधाऱ्याच्या कामाला  सुरवात करा, अशी सूचना ग्रामस्थांनी केली. या वेळी पत्तन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत ग्रामस्थांनी किनाऱ्याची पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here