चिपळूण : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात केंद्र शासनाने लोकांना अल्पदरात रेशनवर धान्य उपलब्ध केले आहे. मात्र, या धान्याचा रेशन दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात अपहार केला जात असल्याचे उघड होत आहे. चिपळुणातील कोंढे येथील गैरप्रकार उघड झाल्यानंतर आता तालुक्यातील नारदखेरकी येथील रेशन दुकानाचा परवाना प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी रद्द केला आहे. शासनाने मोफत धान्य पुरविले असताना त्यामध्ये गैरव्यवहार होत असल्याचे आढळून आले आहे. नारदखेरकी येथील पाच रेशन कार्डधारकांच्या मोफत धान्यात अपहार केल्याची तक्रार आहे. या प्रकरणी रेशन दुकान चालक दिलीप गांधी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
