इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरमधला दहशतवाद्यांचा म्होरक्या असलेल्या बुऱ्हान वणीची जागा घेणाऱ्या हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर रियाज नायकूचा भारतीय लष्करानं खात्मा केला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा भारत आपल्यावर सर्जिकल स्ट्राइक करतो की काय, अशी भीती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना वाटू लागली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या कारवाईनंतर पाकिस्तानविरोधात प्रॉक्सी युद्ध (सर्जिकल स्ट्राइक) सुरू होण्याची भीती आहे, असे ट्विट करत इम्रान खान यांनी भारतावर गंभीर आरोप केले आहेत. इम्रान खान यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, ” भारतामुळे दक्षिण आशियातील शांतता आणि सुरक्षा धोक्यात येण्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय समुदायाने त्याकडे लक्ष देऊन कारवाई केली पाहिजे. काश्मीरमध्ये अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना इम्रान खान यांनी स्थानिक घटना असल्याचं म्हटलं आहे. त्यात पाकिस्तानची कोणतीही भूमिका नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असून, भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी करत असल्याचा कांगावा पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील. सीमेवरील दहशतवाद्यांचा मुद्दा उपस्थित करत भारत पाकिस्तानविरोधात सर्जिकल स्ट्राइकसारखी मोहीम राबवण्याच्या विचारात असल्याचाही आरोप इम्रान खान यांनी केला आहे.
