नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण, ग्रामस्थांच्या तक्रारीकडे संबंधितांचे दुर्लक्ष
लोटे:- (ज्ञानेश्वर रोकडे) लोटे औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक सांडपाण्याचा चेंबर ओव्हरफलो होऊन नाल्यामधील पाणी दूषित होण्याचा प्रकार काल सायंकाळी सहा वाजल्यापासून सुमारे दीड ते दोन तास चालू होता. सदर घटनेची कल्पना तात्काळ ग्रामस्थांनी संबंधितांना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले गेल्यामुळे ग्रामस्थ कमालीचे संतापले होते.
लोटे औद्योगिक वसाहत प्रदूषणाच्या कारणाने कायम चर्चेत असून चेंबर ओव्हरफ्लो, वायुगळती, कारखान्यामधील लहान मोठे अपघात येथे वारंवार होत असतात.यामुळे लोटे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. अशातच आज सायंकाळी सहा वाजल्यापासून सुमारे दीड तास एका कारखान्याच्या मागील बाजूस असलेला एमआयडीसी चा चेंबर ओव्हरफ्लो होऊन कारखान्यांचे रासायनिक सांडपाणी नाल्यामध्ये वाहून जात होते. लोटेचे शिवसेना शाखाप्रमुख श्री. सचिन काते यांनी ही बाब तात्काळ सीईटीपीचे संचालक घरडा कंपनी चे श्री. ए. सी.भोसले, यांना दूरध्वनी वरून सांगीतली.त्यांनी ग्रामस्थांना लगेचच घटनास्थळी येऊन पोहोचतो असे सांगितले,मात्र दीड तास उलटूनही श्री भोसले घटनास्थळी न पोहोचल्याने ग्रामस्थ संतापले व त्यांनी एमआयडीसी च्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला.परंतु एकाही अधिकाऱ्याचा फोन लागला नाही शेवटी ग्रामस्थांनी सदर घटना प्रसारमाध्यमांना दाखवून आम्हा ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यास सहकार्य करा अशी मागणी केली. यावेळी लोटे शिवसेना शाखाप्रमुख सचिन काते, युवासेना उपतालुका अधिकारी चेतन वारणकर,मा.उपसरपंच रवींद्र सावंत,रोहन कालेकर,सौरभ चाळके, सचिन कालेकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.औद्योगिक वसाहती मधील असे गैरप्रकार करणाऱ्या कारखान्यांनी व संबंधित यंत्रणांनी वेळीच खबरदारी घेऊन हे प्रकार थांबवावेत अन्यथा उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा शाखाप्रमुख सचिन काते यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.
