”क्रिकेटच्या पुनर्जन्मासाठी भारत-पाकिस्तान कसोटी मालिका गरजेची” : ब्रॅड हॉज

कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी निधी गोळा होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका खेळवा, असा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनं ठेवला होता. त्यावरून कपिल देव आणि सुनील गावस्कर यांनी टीका केली होती. आता ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूनं भारत-पाकिस्तान मालिकेचा प्रस्ताव ठेवला आहे. क्रिकेटच्या पुनर्जन्मासाठी भारत-पाकिस्तान कसोटी मालिका गरजेची असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रॅड हॉजनं व्यक्त केलं. भारतानं ऑस्ट्रेलिया दौरा न करता पाकिस्तानसोबत कसोटी मालिका खेळावी, अशी अजब मागणीही त्यानं केली. हॉज म्हणाला,”कोरोना व्हायरसचं संकट गेल्यानंतर क्रिकेट चाहत्यांना रोमहर्षक सामने पाहायला आवडतील. त्यामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा रद्द करावी आणि त्याजागी ऑस्ट्रेलियात अॅशेस मालिका खेळवावी. शिवाय भारतानं ऑस्ट्रेलिया दौरा करण्याऐवजी पाकिस्तानविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका खेळावी.” ”कोरोना व्हायरसनं क्रिकेटच्या पुनर्जन्माचे दरवाजे उघडले आहेत. चाहते क्रिकेट सामने पाहण्यासाठी आतुर आहेत आणि सर्व सुरळीत झाल्यानंतर अॅशेज मालिका व्हायला हवी. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येणार आहे, परंतु त्याऐवजी ऑसी संघानं इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळावी. भारताला पाकिस्तानविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळायला हवी. ज्यापैकी प्रत्येकी दोन सामन्यांचे आयोजन पाकिस्तान आणि भारतात व्हायला हवं,”असेही हॉजनं स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here