रत्नागिरी : रत्नागिरीतून मिरजला अहवाल पाठवून त्याचा अहवाल येईपर्यंत वेळ लागतो. त्या-त्या ठिकाणच्या प्रयोगशाळांवर प्रचंड ताण आहे. जिल्ह्याची भौगोलिक रचना पाहता रत्नागिरीमध्ये स्वॅब टेस्टिंग सेंटर शासनाने तात्काळ मंजूर करावे व त्याची तात्काळ उभारणी करणे आवश्यक आहे, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष अँड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे. पटवर्धन म्हणाले, रत्नागिरीत मोठ्या संख्येने बाहेर गावाहून लोक येणार आहेत. त्या सर्वांच्या चाचण्या अनिवार्य आहेत. त्यातच पावसाळा तोंडावर आहे. पावसाळ्यात बरेच वेळा आंबा घाट वाहतुकीसाठी बंद होतो. या सर्व शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात स्वब टेस्टिंग लॅब उभारणे अत्यावश्यक आहे. रत्नागिरीकरांचे आरोग्य कोरोना संकटातही सुरक्षित राहावे, यासाठी अशी लॅब उभारणी अत्यावश्यक ठरते. शासनाने अशी लॅब मंजूर करून लॅबची उभारणी तात्काळ करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
