रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची सायकल दिंडी राईड

0

रत्नागिरी : श्री क्षेत्र पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून आज रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे रत्नागिरी ते पावस व पुन्हा रत्नागिरी अशी सायकल दिंडी काढण्यात आली.

ओम राम कृष्ण हरी नामगजर करत सुमारे ३७ किमीची ही दिंडी सलग दुसऱ्या वर्षी काढण्यात आली. आता दरवर्षी उत्सव काळात असणाऱ्या रविवारी वरची आळी येथील स्वामी स्वरूपानंद अध्यात्म मंदिर ते समाधी मंदिर या मार्गावरून दिंडी काढण्याचा संकल्प करण्यात आला.

आज मारुती मंदिर येथून सकाळी सायकल दिंडी राईडला सुरवात झाली. काही सायकलस्वार जयस्तंभ येथून सहभागी झाले. सायकल चालवूया, प्रदूषण टाळूया, पर्यावरण जपूया, तंदुरुस्त राहूया, मानसिक ताणतणाव घालवूया, प्रतिकारशक्ती वाढवूया आणि रोगमुक्त होऊया, असा संदेश या दिंडीतून देण्यात आला.

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य दिंडी राईडमध्ये सहभागी झाले. विशेष म्हणजे सायकलिस्ट क्लबचे समीर धातकर यांनी रत्नागिरी ते समाधी मंदिरपर्यंत व पुन्हा रत्नागिरी हा प्रवास धावत पूर्ण केला. वाटेत जाताना जयस्तंभ ते समाधी मंदिरला निघालेल्या पायी दिंडीतील सर्व वारकरी भेटले.

रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलनाचे यजमानपद यंदा रत्नागिरी सायकलिस्ट क्लबकडे आहे. येत्या ८ जानेवारीला हे संमेलन टीआरपी येथील अंबर हॉलमध्ये शानदारपणे होणार आहे. या संमेलनाकरिताही नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सायकल संमेलनाकरिता स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिरात प्रार्थना करण्यात आली. तसेच सर्व सायकलपटूंना स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष जयंतराव देसाई यांनी शुभेच्छा देऊन या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले. दरवर्षी सायकलपटूंची संख्या वाढेल, तुमचे सर्वांचे स्वागत असे त्यांनी सांगितले. सेवा मंडळाने सायकलपटूंच्या अल्पोपहाराची व्यवस्था केली. त्यानंतर सायकलपटू पुन्हा रत्नागिरीत परतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:23 19-12-2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here