विद्यापीठ, महाविद्यालयांच्या केवळ अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज शुक्रवारी दुपारी १ वा. राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी परीक्षेसंदर्भात फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या केवळ अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार आहेत. १ ते ३१ जुलै दरम्यान अंतिम वर्षाच्या परीक्षा होतील, मात्र करोना व्हायरसमुळे उद्भवलेली परिस्थिती कायम राहिल्यास २० जूनच्या दरम्यान बैठक घेऊन अंतिम निर्णय होईल, अशी माहिती त्यांनी दिली. इतर सर्व पदवीपूर्व वर्षांच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रमोट केले जाईल. मात्र असे करताना त्यांच्या या वर्षीच्या कामगिरीवर आधारित ५० टक्के मूल्यांकन केले जाईल आणि पुढील वर्षी त्यांची ५० टक्के गुणांची चाचणी घेण्यात येईल. या ५०-५० टक्के फॉर्म्युल्यावर त्यांचे मूल्यांकन होईल. ज्या विद्यार्थ्यांना विशेषत: इंजिनीअरिंगच्या ज्या विद्यार्थ्यांना केटी आहे, त्यांना त्या नापास विषयांची परीक्षा पुढील वर्षी १२० दिवसांच्या आत द्यावी लागणार आहे. १ ते १५ जुलै पदवी अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा, तर २३ ते ३० जुलै दरम्यान पदव्युत्तर परीक्षा होतील. त्यासाठी समिती येत्या दहा दिवसांत निर्णय घेईल, असेही सामंत यांनी सांगितले. प्रत्येक विद्यापीठ आपापले स्वतंत्र वेळापत्रक जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अन्य ज्या पदवीपूर्व वर्षाच्या परीक्षा होणार नाहीत, त्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्षभराच्या कामगिरीच्या आधारे मूल्यांकन करून नवीन वर्गात प्रवेश दिला जाईल. केटीचे विषय १२० दिवसांत परीक्षा घेऊन ते उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, असे श्री. सामंत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here