रत्नागिरी : आंतरजिल्हा बदलीने आलेल्या तेरापैकी आठ प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्या असून अद्यापही पाच शिक्षक जिल्ह्यात येणार आहेत. आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यातून साडेतीनशे शिक्षक सोडण्यात आले. त्याप्रमाणात जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांची संख्या नगण्य आहे. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या सहाशेपर्यंत आहे. येत्या काही दिवसात शिक्षक भरतीप्रक्रिया सुरु होणार असल्याने त्याचा फायदा रत्नागिरी जिल्ह्याला होणार आहे. प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षकांची संख्या कमी आहे. राजापूरसारख्या तालुक्यात शून्य शिक्षकी शाळा असून तिथे तात्पुरत्या शिक्षकांची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेतून आंतरजिल्हा बदलीने बाहेर जाण्यासाठी अनेक शिक्षक सज्ज आहेत. यापूर्वीच्या शिक्षक भरतीमध्ये परजिल्ह्यातील अनेक शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. त्यातील काहीजणं निवृत्तीला आले असल्याने रिक्त पदे वाढत आहे. आंतरजिल्हा बदलीने जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे; मात्र येणाऱ्याची संख्या अल्प आहे. जिल्ह्यातून साडेतीनशेहून अधिक शिक्षक परजिल्ह्यात सोडण्यात आले. तुलनेत जून महिन्यामध्ये आठ शिक्षक रत्नागिरीत दाखल झाले होते. रत्नागिरी जिल्ह्याची निवड केलेल्यांमध्ये पाच शिक्षकांची अजून नावे आहेत. ते अद्यापही रुजू झालेले नाहीत. ते लवकरच रुजू होतील अशी अपेक्षा शिक्षण विभागाकडून केली जात आहे.
