राजापूर : लॉकडाऊन असूनही बाहेर गावाहून अनेकजण लपूनछपून जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत प्रवेश करत आहेत. तरीही योग्य त्या उपाययोजनांमुळे सद्यस्थितीमध्ये राजापूर तालुका सेफ झोनमध्ये आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतून सुमारे २० हून अधिक लोक तालुक्यामध्ये छुप्या पद्धतीने दाखल झाले आहेत. तालुक्यातील २२ जणांचे स्वॅब अहवाल तपासणीसाठी वरिष्ठ पातळीवर पाठविले असून, त्यांच्या येणाऱ्या अहवालाकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तालुक्यामध्ये सुमारे ३३ जण संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये आहेत तर चारशेहून अधिक लोक होम क्वारंटाईन आहेत. गावोगावी दैनंदिन सर्व्हेक्षण करण्यासह अन्य आवश्यक त्या उपाययोजना आरोग्य विभागाकडून सुरु आहेत.
