चाफेरी ग्रामपंचायतीमध्ये विरोधकांचा धुव्वा उडवत आदित्येश्र्वर पॅनलची एकतर्फी बाजी

0

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील बहुचर्चित चाफेरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युती पुरस्कृत आदित्येश्र्वर गाव विकास पॅनलने उद्धव ठाकरे पुरस्कृत पॅनलचा अक्षरशः धुव्वा उडवत विजय मिळवला. थेट सरपंच पदासह सदस्य पदाच्या सर्वच्या सर्व जागा जिंकत चाफेरी ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता स्थापन केली. ना. रविंद्र चव्हाण आणि ना. उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आलेल्या या निवडणुकीत पंचक्रोशीत विवेक सुर्वे नंदू केदारी आणि अमोल बैकर यांचाच करिश्मा कायम असल्याचे निकालाअंती दिसून आले.

चाफेरी ग्रामपंचायतीच्या सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षाकडेच राहिल्या आहेत. मागील पाच वर्षात झालेला विकास यामुळेच येथील ग्रामस्थांनी सत्ताधारी पॅनलच्या सरपंच पदासह सदस्यांच्या सर्वच्यासर्व जागा निवडून देत आदित्येश्र्वर गाव विकास पॅनलवर विश्वास टाकला आहे.

चाफेरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य बाबू पाटील यांनी उद्धव ठाकरे गटाचा पाठिंबा मिळवत स्वतंत्र पॅनल उभे केले. प्रचाराच्या कालावधीत आदित्येश्र्वर पॅनलच्या विरोधात विषारी प्रचार यंत्रणा राबवण्यात आली. मात्र, आदित्येश्र्वर पॅनेलचे नेतृत्व करणाऱ्या नंदू केदारी विवेक सुर्वे आणि अमोल बैकर, महेश चौघुले यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर प्रचार केला. ही निवडणूक भाजप नेते ना. रविंद्र चव्हाण आणि शिंदे गटाचे नेते ना. उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली. प्रचार यंत्रणा राबवताना गावातील प्रत्येक घरातील व्यक्तीसमोर गावात झालेली कामे आणि भविष्यात होणारी कामे ठेवण्यात आली आणि प्रचाराची ही रणनीती यशस्वी झाल्याचे निकालांती दिसून आले.

मंगळवारी झालेल्या मतमोजणीत सरपंच पदाच्या उमेदवार अंजली अमोल कांबळे या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या तर सदस्य पदावर महेश तुकाराम चौगुले, अमित श्रीपत पायरे, अभिजित अनंत गुरव, प्रमिला प्रकाश कांबळे, आरोही अविनाश केदारी, अनिता अनंत बैकर, अंजली अमोल कांबळे हे सातहीजण विजयी झाले आहेत. चाफेरी ग्रामपंचायती पासून विजयाची ही सुरुवात झाली असून संपूर्ण वाटद जिल्हा परिषद गटात बाळा साहेबांची शिवसेना आणि भाजप युतीचा झेंडा फडकवला जाईल असे नंदू केदारी यांनी सांगितले. तर यापुढे निवडणुका लढवण्यापूर्वी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबू पाटील यांनी आधी आत्मपरीक्षण करावे आणि निर्णय घ्यावा असा सल्ला देखील केदारी यांनी यावेळी दिला.

निवडणुकीत मिळालेले हे यश ना. रविंद्र चव्हाण आणि ना. उदय सामंत यांच्या मुळेच मिळाल्याचे माजी पंचायत समिती सदस्य विवेक सुर्वे यांनी सांगितले. याशिवाय अमोल बैकर, महेश चौघुले, संतोष पायरे, नरेंद्र गुरव, विनोद चौघुले, दिपक पाटील, राजेश कासार, संतोष पांगारे, सुनील पाटील, विजय धनावडे, दिपक बैकर, बंड्या वेलणकर, सुरेश पिंपळे, प्रसाद बैकर यांच्यासह अनेकांच्या सहकार्यामुळेच हा विजय शक्य झाल्याचे सुर्वे म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:25 20-12-2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here