केंद्र, राज्य शासनाने घेतलेले निर्णय आणि स्थानिक पातळीवर काढण्यात येणारी परिपत्रके यात सुसूत्रता असावी; आ. भास्कर जाधव यांची मागणी

रत्नागिरी : केंद्र आणि राज्य सरकारने कोरोनाविषयक परिस्थितीबाबत घेतलेले निर्णय आणि स्थानिक पातळीवर काढण्यात येणारी परिपत्रके यात सुसूत्रता असावी, अशी मागणी गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या बाबतीत निर्णय घेताना केंद्र आणि राज्य शासनाने घेतलेले निर्णय आणि स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून काढण्यात येणारी परिपत्रके यात मात्र सुसूत्रता दिसत नाही. याबाबत आपण लक्ष घालावे, असे जाधव यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. जिल्ह्यात शासनाच्या आदेशाप्रमाणे प्रशासकीय अधिकारी म्हणून स्थानिक परिस्थितीचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे. परंतु राज्य शासनाने घेतलेले निर्णय आणि प्रशासनाने स्थानिक पातळीवर घेतलेले निर्णय, मार्गदर्शन सूचना यामध्ये विसंगती, गोंधळाची स्थिती आढळून येते. त्यामुळे जिल्ह्यातील व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. याबाबत ते माझ्याकडे संपर्क साधत आहेत. याबाबत आपण जातीने लक्ष घालून दोन्ही शासनाच्या निर्णयामध्ये सुसूत्रता राहील, याची काळजी घ्यावी. प्रशासन चांगल्या प्रकारे करीत असलेल्या कामाला गालबोट लागू नये, यासाठी संपर्क साधत असल्याचे जाधव यांनी पत्रात म्हटले आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here