रत्नागिरी : विविध योजनांमधून रत्नागिरी जिल्ह्यातील बँकांमध्ये जमा झालेल्या शासकीय अनुदानाच्या १ कोटी २८ लाख रुपयांच्या रकमा पोस्टातून ग्राहकांना देण्यात आल्या. कोरोनाप्रतिबंधक लॉकडाऊनचा कालावधी जाहीर झाल्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जनधन खाते असणाऱ्या महिलांना केंद्रातर्फे आर्थिक रक्कम खात्यात जमा करण्यात आली. किसान सन्मान निधीच्या रकमादेखील बँकांमध्ये जमा झाल्या. या लाभार्थ्यांना बँकेत जाऊन रक्कम काढण्याऐवजी त्यांना पोस्ट खात्यातर्फे जवळच्या पोस्ट कार्यालयातून आधारकार्ड आधारित प्रणालीद्वारे रक्कम दिली जात आहे. याप्रकारे असलेल्या सवलतीचा लाभ जिल्ह्यातील ५०१५ नागरिकांना जिल्ह्यातील ७७ टपाल कार्यालयातून आतापर्यंत १ कोटी २८ लाख रुपयांची रक्कम वितरित झाली आहे. जवळच्या टपाल कार्यालयात ही सुविधा झाल्याने नागरिकांची बँकेत जाणे आणि रांगा लावण्यापासून सुटका झाली.
