राजापूर : गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणारी माती स्थानिक पातळीवर उपलब्ध होत नसून लॉकडाउनमुळे ती अन्य जिल्ह्यातून आणताही येत नाही. त्यामुळे मुर्तीकारांसमोर मूर्ती साकारण्याचा गहन प्रश्न उभा ठाकला आहे. लॉकडाउनचा गणेश मूर्तिकारांना चांगलाच फटका बसला आहे. मात्र, त्यावर मात करीत राजापूर तालुक्यातील सागवे येथील श्रीराम देवधर यांनी टाकाऊ असलेल्या रद्दी कागदाच्या लगद्यापासून ‘इको फ्रेंडली’ गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. मूर्ती तयार करण्यासाठी जरी वेळ लागत असला तरी खर्चाची बचत होते, असं देवधर याचं म्हणणं आहे. कागदी रद्दी पाण्यामध्ये टाकून कुजवली जाते. त्यानंतर कुजलेल्या रद्दीचे बारीक-बारीक तुकडे केले जातात. कागदाचे तुकडे करण्यासाठी श्रीराम देवधर यांनी नवीन युक्ती शोधताना भिंतीमध्ये होल मारावयाच्या ड्रील मशिनला पुढे लांब सळई लावून त्याला गोल फिरणारे पाते लावले. ओले कागदाचे बारीक तुकडे बाहेर काढून साडी वा अन्य कापडामध्ये गुंडाळून त्यातून पाणी काढले जाते. त्यानंतर कागदाचा लगादा तयार होऊन तो साच्यामध्ये मूर्ती तयार करण्यासाठी वापरला जातो. मूर्ती तयार करण्यासाठी सुमारे ऐंशी टक्के कागद तर वीस टक्के माती असते. मूर्तीला केवळ चमक यावी म्हणून मातीचा वापर केला जातो. अशा अनोख्या पद्धतीने मूर्तिकार श्रीराम देवधर सागवे येथे गणेशमूर्ती सकारात आहेत.
