संगमेश्वर पं. स. च्या आमसभेमध्ये हंगामा

0

देवरूख : संगमेश्वर तालुक्यामध्ये नियम धाब्यावर बसवून खासगी कंपनीची केबल खोदाई करून टाकण्यात आली आहे. अनेक ठिकाणीही केबल खासगी जागेतून टाकण्यात आली असून याचा कोणताही मोबदला जनतेला देण्यात आलेले नाही. यावरून संगमेश्वर पं. स. च्या आमसभेमध्ये हंगामा झाला. आ. सदानंद चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला याबाबत जाब विचारला. आमसभेत एसटी, महावितरण या विषयांवर जनतेकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. शहरातील माटे भोजने सभागृहांमध्ये ही आमसभा आमदार सदानंद चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर जि.प.शिक्षण सभापती सहदेव बेटकर, जि. प.आरोग्य सभापती विनोद झगडे, माजी जि. प.अध्यक्ष संतोष थेराडे, तालुका प्रमुख प्रमोद पवार, सभापती सोनाली निकम, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, उपसभापती अजित गवाणकर, तहसीलदार संदीप कदम, जि. प. सदस्य रोहन बने, नेहा माने, वेदा फडके आदींसह जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्यवलोकप्रतिनिधी व्यासपीठावर उपस्थित होते. सभेत प्रामुख्याने तालुक्यामध्ये टाकण्यात आलेल्या खासगी कंपनीच्या केबलचा विषय गाजला. डॉ. अमित आठरे, विनोद म्हस्के यांनी ही केबल चुकीच्या नियमानुसार टाकण्यात आली असून, केलेल्या खोदाईमुळे अनेक अपघात होत आहेत. खासगी जागेतून केबल टाकण्यात आल्यामुळे त्याचा मोबदलाही जागा मालकाला देण्यात आला नाही, याबाबत प्रश्न विचारले. त्याचे उत्तर सार्व. बांधकाम विभागाकडून देता आले नाही. यावर आमदार चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला कंपनीकडून मिळालेल्या अनामत रकमेतून रस्त्यांची दुरुस्ती करून द्यावी, खासगी जागेतून गेलेल्या रस्त्याचा मोबदला देण्यात यावा, अशा सूचना केल्या. उपस्थित जनतेतून एसटी या विषयावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावर आगार व्यवस्थापिका मृदुलाजाधवएसटी फेऱ्या बंद असल्या मागचे कारण सांगताना ४० वाहक व चालक आगारात कमी असल्याचे निदर्शनस आणले. यावेळी महावितरणचेही प्रश्न उपस्थित करताना नागरिकांनी अनेक ठिकाणी गंजलेले खांब असून ते बदलले जात नाहीत, असा आरोपही करण्यात आला. यावेळी उपस्थित शाखा अभियंत्यांनी २५ लाख रुपये पोल बदलण्यासाठी उपलब्ध आहेत. लवकरच पोल बदलले जातील, अशी ग्वाही दिली. तालुक्यामध्ये शिक्षकांची कमतरता आहे, अनेक शाळा नादुरुस्त आहेत, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावर शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांनी लवकरच शिक्षकांची भरती होत असून कमी शिक्षकांचा मार्ग मोकळा होणार असल्याचे सांगितले, शाळा दुरुस्ती, कंपाउंड वॉल व वाढीव वर्गखोल्या याबाबतचे प्रस्ताव थेट सरपंचांनी आपल्याकडे सादर करावेत, त्वरित हे प्रश्न आपण सोडवू, अशी ग्वाही दिली. शेतकरी विमा अपघात योजनेचे प्रस्ताव तालुक्यामध्ये तयार करण्यात आले असतानाही केवळ एकच प्रस्ताव मंजूर केला जातो. असा आरोप सुरेश सप्रे यांनी केला. यावर लवकरच कार्यालयाकडून या प्रस्तावांना गती दिली जाईल, असे तालुका कृषी विभागाकडून सांगण्यात आले. यावेळी आरोग्य, कृषी, पंचायत समिती, महसूल या विषयांवर धावता आढावा घेण्यात आला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here