रत्नागिरी : कोरोनाप्रतिबंधक लॉकडाऊनमुळे जीव धोक्यात घालून मुंबईहून कोकणच्या दिशेने पायी चालत निघालेल्यांसाठी वाहने उपलब्ध करून त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवावे, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा गाव विकास समितीने केली आहे. समितीचे संघटनप्रमुख सुहास खंडागळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना त्याबाबतचा ईमेल रवाना केला आहे. पत्रात म्हटले आहे की, जे नागरिक मुंबई-पुण्याहून चालत कोकणच्या दिशेने घराकडे निघाले असतील आणि ज्यांनी अर्धी वाट पार केली आहे, अशांना वाहने उपलब्ध करून देऊन सुरक्षित स्थळी सोडण्यात यावे. रणरणत्या उन्हात नागरिकांनी लहान मुले आणि महिलांसह चालत प्रवास करणे जीवघेणे आहे. त्यामुळे त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. तसेच मुंबई-पुणे येथून पायी येणाऱ्या नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाइन नंबर जाहीर करावा, अशी मागणीही खंडागळे यांनी केली आहे.
