रत्नागिरी : कोरोनाप्रतिबंधक लॉकडाऊनमुळे रत्नागिरी जिल्ह्यात गेला सुमारे दीड महिना अडकून राहिलेले सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील मूळचे नागरिक एसटीने शुक्रवारी रवाना झाले. सादर झालेल्या अर्जांमधील पहिल्या टप्प्यातील मंजूर अर्जांनुसार नागरिकांना शुक्रवारी एसटीच्या विशेष सहा गाड्यांमधून दोन जिल्ह्यांमध्ये जाण्याची सोय प्रशासनाने उपलब्ध करू दिली. रत्नागिरी आणि चिपळूण बसस्थानकांवरून रायगड आणि सिंधुदुर्गसाठी बस सोडण्यात आल्या. दापोली बसस्थानकातून रायगडसाठी, तर लांजा बसस्थानकातून सिंधुदुर्गसाठी बस सोडण्यात आली. या प्रत्येक बसमधून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सरासरी २२ आणि एकूण १३२ प्रवासी पाठविण्यात आले. एसटी विभागाकडून प्रवाशांना पाणी, जेवण आणि बिस्कीटपुडा देण्यात आला. आज (दि. ९ मे) सिंधुदुर्ग, रायगड, बुलढाणा, लातूर, सातारा आणि भंडारा जिल्ह्यांसाठी 16 बसचे नियोजन करण्यात आले आहे. रविवारी गोंदिया, अमरावती जिल्ह्यांसाठी तीन बसेस जिल्ह्यातून सोडण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली.
