अजित पवारांनी सांगितला AU चा अर्थ..

0

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गेल्या आठवड्याभरात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. मग तो महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न असो किंवा मग युती सरकारच्या काळात झालेलं फोन टॅपिंग प्रकरण असो.

मात्र, गेल्या दोन दिवसांत दिशा सालियान मृत्यू प्रकरणामुळे अधिवेशनात दोन्ही बाजूंनी तुफान आरोप-प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी रिया चक्रवर्तीच्या फोनवर AU नावाच्या नंबरवरून ४४ फोनकॉल्स आल्याचा आरोप राहुल शेवाळेंनी केल्यानंतर त्यावरून अधिवेशनात रणकंदन झालं. आमदार नितेश राणेंनी AU वरुन ठाकरे कुटुंबीयांकडे बोट दाखवलं. मात्र, यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात एयुचा अर्थ सांगितला.

AU या शब्दाचा अर्थ काय असे म्हणत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी ठाकरे कुटुंबीयांकडे बोट दाखवले होते. मात्र, अजित पवार यांनी विधानसभा सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना AU चा अर्थ स्पष्ट केला. यावेळी, अजित पवारांनी रिया चक्रवर्तीचा संदर्भ दिला. रियाने दिलेल्या माहितीनुसार, स्पष्टीकरणानुसार एयु म्हणजे अनन्या उदास… असा त्याचा अर्थ आहे. विनाकारण कुणालाही बदनाम करू नये, अशा शब्दात अजित पवार यांनी सत्ताधारी आमदारांवर पलटवार केला.

दरम्यान, माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाडांनी सरकार आदित्य ठाकरेंना घाबरत असल्याचा खोचक टोला लगावला. “माझ्या बाजूला उभे असलेले आमचे बंधुतुल्य सहकारी आदित्य ठाकरे यांच्यावर एसआयटी बसवायची. दर आठ दिवसांनी त्यांना बोलवायचं. मग तुम्ही जाणार, टीव्हीवर दिसणार. या ३२ वर्षांच्या तरुणाला हे सरकार किती घाबरलंय हे महाराष्ट्र बघणार आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

AU म्हणजे अन्यन्या उदास?
रिया चक्रवर्तीला फोन आलेला AU हा नंबर म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे यांचाच असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. मात्र, यासंदर्भात इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्वत: रिया चक्रवर्तीनंच AU म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे नसून अनन्या उदास असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र, यावरून विधानसभेत खडाजंगी झाल्यानंतर चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:28 24-12-2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here