शिस्तबद्ध संचलनातील स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी

0

◼️ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ; रत्नागिरीत पथसंचलन

रत्नागिरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दक्षिण रत्नागिरी विभागातर्फे रत्नागिरी शहरात रविवारी (ता. २५) सायंकाळी शिस्तबद्ध संचलन झाले. सुमारे दोन तास झालेल्या पथ संचलनातील स्वयंसेवकांवर नाक्यानाक्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

पांढरा शर्ट व खाकी पँट, दंड घेतलेल्या स्वयंसेवकांच्या संचलनाने रत्नागिरीकरही उत्सुकतेने पाहत होते आणि या संचलनाने शिस्त आणि देशभक्तीची चेतना जागवली. घोषपथकांनीही या संचलनात स्वतंत्र छाप उमटवली.

सायंकाळी ४ वाजल्यापासून शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे संघ स्वयंसेवक येऊ लागले. त्यानंतर शिस्तबद्ध सात वाहिन्या बनवण्यात आल्या. ध्वजारोहण झाल्यानंतर संचलनास सुरवात झाली. हे पथ संचलन क्रीडा संकुल येथून कॉंग्रेसभुवन नाकामागें टिळक आळी, शेरे नाका, झाडगाव नाका, भैरीचा होळीचा मांड, झाडगाव झोपडपट्टी, खालची आळी, ग्रामदैवत श्री भैरी मंदिर, महादेव अपार्टमेंट, ८० फुटी हायवे, भुते नाका, बंदर रोड, मुरलीधर मंदिर, हॉटेल विहार वैभवमार्गे पुन्हा क्रीडा संकुल येथे आले.

संचलनामध्ये दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यातील ५०० हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले. टिळक आळी मारुती गणपती मंदिर, झाडगाव येथे रा. स्व. संघाचे माधवराव मुळ्ये भवन, खालची आळी नाका, बंदररोड नाका या ठिकाणी संचलनावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच प्रत्येक ठिकाणी, नाक्यानाक्यावर शालेय मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांनी थांबून पथसंचलन पाहिले आणि आनंद व्यक्त केला. संचलनाची सांगतेप्रसंगी विभाग सहकार्यवाह उत्तम आंबेकर यांनी मार्गदर्शन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:05 26-12-2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here