मुंबई : इक्बाल चहल यांनी महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेत झाडाझडती सुरू केली आहे. चहल यांनी सायन रुग्णालयात मृतदेहांशेजारी रुग्णांवर उपचार सुरू असल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांची अधिष्ठाता पदावरून उचलबांगडी केली आहे. त्यांच्या जागी वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांची सायन रुग्णालयाचे नवे अधिष्ठाता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच रमेश भारमल यांच्यावर कुपर हॉस्पिटल आणि एच.बी.टी मेडिकल कॉलेज यांच्यावर देखरेख ठेवण्याचीही जबाबदारी असेल. याशिवाय, सायन आणि कुपर रुग्णालयाच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी आयएएस प्राजक्ता लवंगारे यांच्याकडे विशेष जबाबदारी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारीच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून कामात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला होता. यानंतर लगेचच प्रमोद इंगळे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:11 PM 09-May-20
