भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर पुन्हा एका समाजकार्यासाठी पुढे आला आहे. कोरोना व्हायरच्या रुग्णांची वाढती संख्या आणि त्यामुळे वाढणारा लॉकडाऊन, यामुळे हातावर पोट असलेल्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या मदतीसाठी तेंडुलकरनं आधीच पुढाकार घेतला होता. पण, तेंडुलकर इथवरच थांबला नाही त्यानं मदतीचा ओघ कायम राखण्याचा निर्धार केलेला दिसत आहे. कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी तेंडुलकरनं पंतप्रधान आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीत प्रत्येकी 25 लाखांची मदत केली होती. त्यानंतर त्यानं अपनालय या संस्थेला मदत करताना 5000 लोकांच्या एका महिन्याच्या रेशन खर्च उचलला. लॉकडाऊनच्या काळात रोजंदारी कामगार करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या हाताला कामच नसल्यानं त्यांच्या रोजच्या जेवणाची आबाळ झाली आहे. अशांच्या मदतीसाठी तेंडुलकरनं पुढाकार घेतला आहे. अपनालय संस्थेनं त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्ट लिहीली होती की,”लॉकडाऊनच्या काळात गरजूंना मदत करण्यासाठी पुढे आलेल्या सचिन तेंडुलकरचे आभार. तेंडुलकर 5000 लोकांच्या महिन्याच्या रेशनचा खर्च उचलणार आहे.” त्यात आणखी एक पाऊल पुढे टाकताना तेंडुलकरनं मुंबईतील वंचित कुटुंबातील मुलांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. Hi5 फाऊंडेशनला तेंडुलकरनं आर्थिक मदत केली आहे. तेंडुलकरच्या मदतीनंतर Hi5 फाऊंडेशन जवळपास 4000 वंचितांना मदत करणार आहे. यामध्ये पालिका शाळेती मुलांचाही समावेश आहे. Hi5 फाऊंडेशन ही अमेरिकेतील स्वंयसेवी संस्था आहे. ते सध्या भारतातील 2100 मुलांना मदत करत आहेत. भारतात बास्केटबॉल खेळाचा प्रसार व्हावा, हे या संस्थेचं मुख्य हेतू आहे.
