रत्नागिरी : मुंबई-पुण्याला आंबा पोहोचवून परतताना कोरोना प्रतिबंधक लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवून रिकाम्या ट्रकमधून प्रवाशांची अयोग्य पद्धतीने वाहतूक होऊ नये, यासाठी आता आंबा बागायतदार प्रयत्न करणार आहेत. रत्नागिरीचे शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या उपस्थितीत आंबा बागायतदारांच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला. करोनामुळे आंबा बागायतदार अडचणीत येऊ नयेत, यासाठी शेतमाल वाहतूक आणि विक्री सुरू ठेवण्यात आली आहे. त्याचाच गैरफायदा घेऊन आंबा वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून मुंबईकर चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत. त्याची गंभीर दखल प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. काही गुन्हेही दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील बागायतदार शासनाच्या दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करत आहेत; मात्र काही मोजक्या चालकांकडून गैरफायदा घेण्यात आला. मुंबई, पुण्यासारख्या रेडझोनमधून आंबा पोचवून येणार्यांसाठी बागायतदारांकडूनच काळजी घेण्यात येत आहे. वाहतुकदारांच्या गाड्या परजिल्ह्यातून रत्नागिरीत आल्यावर चालक आणि मदतनीस यांनी सरसकट लोकांमध्ये मिसळू नये याची खबरदारी घेण्यात येणार आहे. त्या लोकांना गोडावून किंवा पॅकहाऊसच्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. हंगाम संपल्यानंतर त्यांची तपासणी करुन घरी पाठविण्यात येईल. त्यांची निवासाची व्यवस्था बागायतदार करणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भात होण्यापुर्वी अनेक नेपाळी गुरखे आंबा बागायतदारांकडे दाखल झाले आहेत. हंगाम संपल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे.
