नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात देशाचा विकासदर शून्य टक्के राहण्याचे भाकीत क्रेडिट रेटिंग एजन्सी मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने वर्तवले आहे. हे भाकीत वर्तवताना वाढलेली वित्तीय तूट, सरकारी कर्जांमध्ये झालेली वाढ, वित्तीय क्षेत्राची नाजूक अवस्था आणि रुतलेले अर्थचक्र या बाबींची नोंद घेतली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारताच्या आर्थिक वृद्धीच्या गुणवत्तेमध्ये घसरण झाली आहे. ग्रामीण कुटुंबांची घसरलेली आर्थिक स्थिती, अपेक्षेपेक्षा कमी उत्पादकता आणि कमी रोजगारनिर्मिती यातून ही बाब लक्षात येत असल्याचेही मूडीजने म्हटले आहे. तर आता करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा देशाच्या आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. मूडीजने आपल्या नव्या अंदाजात आर्थिक वर्ष २०२०-२१मध्ये भारताचे एकूण देशांतर्गत उत्पादनाचा (जीडीपी) वृद्धीदर शून्यावर जाऊ शकतो, असे नमूद केले आहे. मूडीजने २०२१-२२ या आर्थिक वर्षात जीडीपीचा वृद्धी दर ६.६ टक्क्यांवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या क्रेडिट रेटिंग एजन्सीने दिलेल्या इशाऱ्यानुसार करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे बसलेल्या झटक्यांमुळे आधीच आर्थिक वृद्धीत घट नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे वित्तीय तूट कशी कमी करता येईल यावर केंद्र सरकारने जोर देण्याची आवश्यकता असल्याचेही नमूद केले आहे.
