रत्नागिरी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चाकरमान्यांना गावाची ओढ लागली आहे. त्यांना गावी आणण्यासाठी शासनाकडूनही सकारात्मक भुमिका घेतली जात आहे; परंतु तिकडून आणल्यानंतर चाकरमान्यांना गावातच विलगीकरण करुन ठेवले जाणार आहे. येणार्यांची संख्या अधिक आणि रिकाम्या खोल्या कमी अशी स्थिती आहे. त्यांची व्यवस्था करताना ग्रामकृतीदलाची तारांबळ उडालेली आहे. या नियोजनासाठी बैठकांवर बैठका झडत आहेत. जिल्हा प्रशासनानेही चाकरमान्यांना सुरक्षित राहता यावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी गावागावातील जागा निश्चित करुन ठेवल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या रिकाम्या शाळा, सभागृह, महाविद्यालयांच्या जागांची माहिती गोळा करण्यात आली आहे. मुंबईत राहणार्यांची माहिती संकलित करण्याचे काम ग्रामपंचायतस्तरावर पूर्ण झाले आहे. संख्या लक्षात आल्यामुळे त्यांना संस्थात्मक क्वारंटाईनसाठी कसे ठेवायाचे यासाठी विचारविनिमय सुरु झाला आहे. काही गावांमध्ये येणार्या लोकांची संख्या अधिक आहे. त्यांच्यासाठी गावातील गोडावूनपासून रिकामी घरेही शोधण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी ग्रामकृतीदलाचे सदस्य कार्यरत आहेत. काही गावातील रिकामी घरांचा वापर करताना नकारात्मक भुमिका घेतली जात आहे. जिल्हा परिषदेच्या वर्गखोल्या लहान असल्यामुळे तिथे व्यवस्था करणे शक्य नाही. काहींना घरी विलगीकरणात ठेवण्याचाही प्रस्ताव होता; मात्र मुंबईकर चाकरमान्यांवर लक्ष कोण ठेवणार हा प्रश्न प्रशासनाला सतावत आहे. ते गावात बिनधास्तपणे फिरले तर त्यातून वाद उद्भवण्याची शक्यता आहे. ते टाळण्यासाठी संस्थात्मक क्वारंटाईनला सर्वाधिक महत्व दिले जात आहे. मात्र जागा शोधताना ग्रामकृतीदलातील सदस्यांना पायपीट आणि मालकांची मनधरणी करावी लागत आहेत. या सर्वांग अडचणींचा सामना करत प्रशासन चाकरमान्यांची व्यवस्था करत आहे.
