रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून मुंबईतून येणारे चाकरमानीच बाधित होत आहेत. याचा विचार करून चाकरमान्यांना कोकणात आणण्याबाबत फेरविचार करणे आवश्यक आहे, असे मत भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असताना अनेक जण रत्नागिरीत दाखल होत आहेत. छुप्या मार्गाने प्रशासनाच्या डोळ्यांत धूळफेक करूनही अनेक जण येत आहेत. सुमारे ३० हजारांहून अधिक रत्नागिरीत यायचे आहे. ते रुग्ण रोगप्रवाहक बनू शकतात. त्यांची तपासणी तसेच विलगीकरण, आरोग्य सुविधा या सर्वच व्यवस्थेवर ताण पडत आहे. अशा स्थितीत धोका वाढू शकतो. त्यामुळे प्रशासनाने परजिल्ह्यातून नागरिकांना आणण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा. आवश्यक सुविधा यंत्रणा आधी परिपूर्ण करावी. गावागावांतील, शहरातील स्थानिकांना या नागरिकांच्या येण्याबाबत अधिकृत माहिती प्रसिद्ध करावी. गावात शहरात केलेली व्यवस्था जाहीर करावी. येणाऱ्या परजिल्ह्यातील नागरिकांची तपासणी करून त्यांना संस्थात्मक विलगीकरण अनिवार्य करावे. लपून, गुंगारा देऊन प्रवेश करणाऱ्यांवर लक्ष देऊन कठोर कारवाई करावी आणि हे सगळे करणे शक्य असेल तरच परजिल्ह्यातील नागरिकांना रत्नागिरीत प्रवेश द्यावा, असे पटवर्धन यांनी सांगितले.
