रत्नागिरी : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची भन्नाट कल्पना आता रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये सत्यात उतरली आहे. या कल्पनेला मूर्त स्वरूप देणारे रत्नागिरीचे रहिवासी संजय वैशंपायन यांनी तयार केलेल्या रोबोमुळे आता वॉर्डबॉय अथवा डॉक्टरांना पेशंटच्या जवळ न जाताच औषध पोहचवणे, माहिती घेणे, जेवण पोहचवणे शक्य झालय. जिल्हा रुग्णालयात हा रोबो आता अहोरात्र काम करू लागला आहे. यामुळे नित्याच्या कामांसाठी रुग्णासोबत करावा लागणारा संपर्क टाळता येणार असल्याने वैद्यकीय सेवेत काम करणाऱ्यांच्या आरोग्यासाठी देखील ते सोयीचे ठरत आहे. हा रोबो प्रत्येक पेशंटच्या जवळ जाऊन त्याची माहिती गोळा करू शकतो, यावर बसवण्यात आलेल्या माईक आणि स्पीकरमुळे वॉर्डबाहेर उभे राहून डॉक्टरांना रुग्णांशी संवाद साधणे शक्य होत आहे. यामुळे वॉर्डमध्ये फिरण्याची ऑटोमॅटिक यंत्रणा कार्यान्वित झाली असून नर्स डॉक्टर यांना या यंत्रणेमुळे खूपच मदत होत आहे. हा रोबो चार्जिंग केलेल्या बॅटरीवर चालतो व याला एका रिमोट द्वारे नियंत्रित करता येते. संजय वैशंपायन यांनी हा रोबो पूर्णपणे रत्नागिरीतच बनवला आहे. सध्या 20 ते 22 किलो वजन हा नेऊ शकतो म्ह्णजे 12 पेशंट चे पाणी, जेवण एकावेळी यावरून नेता येते. संजय वैशंपायन यांचे शिक्षण एमए पर्यंत असून सध्या ते महावितरणमध्ये नोकरीला आहेत. त्यांच्या घराण्यात निरीक्षण करणे व नवनिर्मिती करण्याचे संस्कार आहेत, प्रयोगशीलतेमध्ये आजोबा जर्मन वैशंपायन म्हणून ओळखले जात. लवकरच या रोबोवर कॅमेरा मॉनिटर बसवून पुढील आवृत्ती करण्याचा त्यांचा विचार आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांच्या या भन्नाट कल्पनेला वैशंपायन यांनी मूर्त स्वरूप दिलंय. कदाचित संपूर्ण देशात हि यंत्रणा राबवण्यावर विचार होऊ शकतो.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
01:34 PM 11/May/2020