मुंबई | पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, पुणे, सातारा या भागात अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूरला महापूराला सामोरं जावं लागत असतानाच आता आणखी पुढील 48 तासात या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील काही भागांत अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. 9 ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसतील, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या आठवड्याभरापासून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे कोल्हापूर, सांगलीमध्ये नद्या, नाले, धरणं भरुन वाहत आहेत. दरम्यान, कोल्हापूर आणि सांगलीत अद्यापही पाऊस सुरूच आहे आणि त्यातच आता अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्याने येते ४८ तास हे फारच महत्वाचे असणार आहेत.
