इतिहासाविषयी प्रेम निर्माण होण्यासाठी पूरक पुस्तिका तयार करण्याचा मानस : चारुदत्त आफळे

0

रत्नागिरी : शालेय वयापासूनच इतिहासाविषयी प्रेम निर्माण व्हावे, यासाठी विद्यार्थ्यांकरिता इतिहासाची पूरक पुस्तिका तयार करण्याचा प्रवचनकारांचा मानस आहे, अशी माहिती राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त बुवा आफळे यांनी दिली.

रत्नागिरीत सुरू असलेल्या पाच दिवसांच्या कीर्तनसंध्या महोत्सवातील दुसऱ्या दिवशी कीर्तन करताना श्री. आफळे बुवांनी ही माहिती दिली. कीर्तनामध्ये निरूपण करताना ते म्हणाले, पूर्वीच्या तिसरी-चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये शिवाजी महाराजांविषयी संपूर्ण माहिती दिली जात होती. आता इतिहास महामंडळाने एका पुस्तकात चंद्रगुप्त मौर्यापासून ते पेशवाई संपेपर्यंतच्या म्हणजे दोन हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास एका पुस्तकात दिला आहे. त्यामध्ये शिवाजी महाराजांसाठी पाच पाने, तर महाप्रतापी महाराणा प्रतापाची ओळख अवघ्या सहा ओळीमध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे मुलांमध्ये इतिहासाचे प्रेम कसे निर्माण होणार, प्रश्न आहे. त्यावरचा उपाय म्हणून इतिहासाच्या अनास्थेविषयी खंत असणारे अभ्यासक, व्याख्याते आणि प्रवचनकार एकत्र येणार आहेत आणि सर्व इयत्तांसाठी इतिहासाची पूरक पुस्तिका तयार करणार आहेत. पूर्वी इंग्रजीची पूरक पुस्तिका होती. तसाच हा प्रयत्न असेल.

चितोडचा राजा बाप्पा रावळ आणि त्याचा वंशाच्या खुमांड रावळ यांनी २४ लढाया जिंकल्या. त्याविषयीची नोंद चीनच्या इतिहासकारांनी विशेष उल्लेख म्हणून केली आहे. आयुष्यभर मोगलांच्या वावटळीला थोपवून धरणाऱ्या खुमांड रावळामुळे भारताच्या पलीकडे जाऊ इच्छिणाऱ्या गजनी किंवा घोरीच्या महत्त्वाकांक्षी आक्रमणाला थोपविले गेले. चीन त्यामुळे बचावला, अशी नोंद चीनच्या इतिहासकारांनी केली आहे. असा वैभवशाली इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर त्याविषयी उत्सुकता आणि प्रेम निर्माण झाले पाहिजे. तोच प्रयत्न पूरक पुस्तिकांमधून केला जाणार आहे, असे आफळे बुवांनी सांगितले. चित्रपट आणि मालिकांमध्ये रामायणापासून ते वैभवशाली भारतीय इतिहासापर्यंतच्या अनेक घटनांची मोडतोड करून ते विकृत स्वरूपात मांडले जाते. तोच खरा इतिहास आहे, असे वाटू लागते, अशी खंत व्यक्त करून बुवांनी जैत्रसिंह रावळ. चित्तोड, रणथंभोर किल्ल्यावर झालेल्या लढाया, जलालुद्दीन आणि अल्लाउद्दीन खिलजी यांनी राजस्थान आणि गुजरातनंतर महाराष्ट्रातील विजयनगर साम्राज्यावर केलेले आक्रमण, तेथे वापरलेले मंगोलियन युद्धतंत्र याविषयीची माहिती दिली. चितोडची राणी पद्मिनी आणि तिच्यानंतर सुमारे अडीचशे वर्षांनंतर लिहिल्या गेलेल्या पद्मावत महाकाव्यातील विसंगती त्यांनी सांगितल्या आणि इतिहासाचा आधार घेऊन चितोडचा राजा रत्नसिंह आणि त्याची राणी पद्मिनी यांच्या बलिदानाचे कथन केले. पराभवानंतर आपल्यासह राजपूत स्त्रिया यवनांच्या ताब्यात गेल्यानंतर आपले सक्तीने धर्मांतर केले जाईल, अशा महिलांच्या पोटी भारतीय संस्कार नसलेली प्रजा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशावर मोठे संकट येऊ शकते, हे लक्षात घेऊन पद्मिनीने आणि तिच्याबरोबर बालिकांसह सर्व स्त्रियांनी जोहार करून आपले जीवन संपविले. पद्मिनीचा तो मूळ उद्देश आजच्या समाजाने लक्षात घेतला, तर लव्ह जिहादसारखी प्रकरणे होणार नाहीत आणि पद्मिनीचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, अशी अपेक्षा आफळे बुवांनी व्यक्त केली.

राम के गुणगान करिये राम प्रभू की भद्रता का सभ्यता का ध्यान करिये या हिंदी रचनेवर आफळे बुवांनी पूर्वरंगाचा प्रारंभ केला. त्यात त्यांनी रामाच्या ठिकाणी असलेल्या ८४ गुणांचे वर्णन केले. त्राटिका आणि स्वभावचा वध करणे, शिवधनुष्य पेलणे किंवा परशुरामासारख्या क्रोधाग्नीला शांत करण्याची क्षमता दाखवणाऱ्या रामाने कैकेयीमातेला वडिलांनी दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी वनवास पत्करला. त्याचा भाऊ लक्ष्मणसुद्धा सामर्थ्यवान होता. रामाला वनवासात पाठवायचे ठरल्यानंतर त्याला बाजूला करून धाकट्या भरत आणि शत्रुघ्नचा सहज पराभव करून, दशरथाला तुरुंगात टाकून राज्यावर बसणे लक्ष्मणाला शक्य होते, पण ते त्याने केले नाही. पितृप्रेम, बंधूप्रेमाची ही उदाहरणे म्हणजे भारतीय संस्कृती आहे. विधवांना सन्मान देण्यासाठी आता सुरू झालेल्या चळवळीचा उल्लेख न करता विधवांविषयी रामायणकाळापासून असलेल्या भूमिकेचे संदर्भ त्यांनी दिले. वनवास संपवून राम परत आल्यानंतर त्याला त्याच्या तिन्ही विधवा मातांनी औक्षण केले. पांडवांचे औक्षण कुंतीने केले, तेव्हा ती विधवा होती. शिवरायांचा राज्याभिषेक झाला, तेव्हा जिजामातेने त्यांचे औक्षण केले. तेव्हा जिजामाताही विधवाच होत्या. विधवांना एकेकाळी जो बहुमान होता, तो आता का दिला जात नाही, हा प्रश्न आहे. याविषयी समाजाने धर्मसत्तेवर दबाव आणला पाहिजे. विविध धार्मिक गोष्टींचेही परिनिरीक्षण झाले पाहिजे. धर्माचाऱ्यांना याबाबतचा जाब विचारला गेला पाहिजे, असे त्यांनी सूचित केले.
बुवांना या कीर्तनासाठी प्रथमेश तारळकर (पखवाज), वरद सोहोनी (ऑर्गन), उदय गोखले (व्हायोलिन), केदार लिंगायत (तबला) आणि कीर्तनकार नरहर बुवा करंबेळकर (तालवाद्य) यांनी साथ केली.

मध्यंतरात प्रश्नमंजूषा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. दिलेल्या शब्दासाठी मृत्यूलाही सामोरे जाणारे राजे कोण, असा प्रश्न पहिल्या दिवशीच्या कीर्तनावर आधारित विचारण्यात आला होता. राजा हरिश्चंद्र, राजा दशरथ आणि शिबी राजा अशी योग्य उत्तरे पूर्वा चौगुले, सिद्धी अभिजित कोळेकर आणि देवांशी आशीष चौगुले यांनी दिली. त्यांना बुवांच्या हस्ते श्रीशिवछत्रपती समर्थ योग ग्रंथ देऊन गौरविण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 06-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here